शिंदे अजित पवारांमध्ये मध्य रात्री खलबत, जागा वाटपावर चर्चा

मुंबई, १२ सप्टेंबर २०२४: राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकांची तयारी राजकीय पक्ष करत आहेत. आघाडी आणि युतीची चाचपणी सुरू झाली आहे. जागावाटप कसं होणार, कुणाला किती जागा मिळणार याचा कोणताही फॉर्म्यूला अजून समोर आलेला नाही. मात्र नेते मंडळींच्या बैठका सुरू आहेत. अशीच एक बैठक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बुधवारी रात्री झाल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येतील आणि जागावाटप या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

निवडणुकीत जागावाटपाचा मुद्दा संवेदनशील आहे. कोणत्या जागा कुणाला द्यायच्या हा मोठा पेच आहे. अजित पवारांच्या एन्ट्रीने युतीतील जागावाटपाचं समीकरण क्लिष्ट झालं आहे. यामुळेच खटकेही उडू लागले आहेत. त्यामुळे जागावाटपात नेते मंडळींची कसरत होणार हे ठरलेलंच आहे. त्यामुळे जागावाटपाच्या मुद्द्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसह अन्य काही योजना सुरू केल्या आहेत. या योजनांना नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे. आता या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा घेऊन जाता येतील यावर बैठकीत चर्चा झाली. या योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी शिवसेनेने एक अहवाल तयार केला आहे. या अहवालावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या योजना लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा झाल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांना दिली.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी वादातीत मतदारसंघांबाबत बैठक घेऊन लवकरात लवकर हा विषय मार्गी लावावा अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आता याच आठवड्यात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊन यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. जर ही बैठक झाली तर या बैठकीत काय निर्णय होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.