परळीमध्ये मध्यरात्री धनंजय मुंडे यांचा अपघात; थोडक्यात बचावले
परळी, ४ जानेवारी २०२३ : भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघाताची घटना ताजी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला मध्यरात्री परळी शहरामध्ये अपघात झाला. मुंडे यांची तब्येत स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. स्वत: धनंजय मुंडेंनी हे ट्वीट केलं आहे.
धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून रात्री परळीकडे परत येताना हा अपघात झाला. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे छोटासा अपघात झाला असून धनंजय मुंडेंना किरकोळ दुखापत झाली आहे.
या ट्वीटमध्ये घटनाक्रम सांगण्यात आला आहे. “मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परत येत असताना रात्री १२.३० च्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. धनंजय मुंडेंच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे”, अशी माहिती या ट्वीटमध्ये देण्यात आली आहे.
दरम्यान, या ट्वीटवर धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
राजकीय नेत्यांनी रात्री या रात्री प्रवास टाळावा असे आवाहन वारंवार केले जात आहे. जयकुमार गोरे यांच्या अपघातानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी तशी मागणी केली होती. मात्र, राजकीय व्यक्तींचं व्यस्त कार्यक्रम त्यामुळे रात्रीचा प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे. अशा वेळेस हे अपघात घडत असल्याचे समोर आले.