रस्त्याच्या निविदेच्या दबावाची पालकमंत्र्यांकडे तक्रार

पुणे, ४ जानेवारी २०२३ ः पथ विभागाच्या ५३ कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत प्रचंड राजकीय हस्तक्षेप करून आपापल्या ठेकेदाराला काम मिळावे यासाठी आमदार, माजी सभागृहनेते, माजी नगरसेवकांच्या कुरघोड्या सुरू झालेल्या असताना याची तक्रार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आलेली आहे. राजकीय दबाव आणि नियमबाह्य पद्धतीने ठेकेदाराला पात्र करण्यासाठी सुरू असलेला त्रास याची माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली. नियमानुसार निविदा मान्य करा, चुकीच्या पद्धतीने कोणी वागत असेल तर कारवाई करा असे आदेश प्रशासनाला दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहरातील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी बैठक घेतली. यामध्ये कोथरूड परिसरातील नव्याने केले जाणारे डीपी रस्त्यांवर चर्चा झाली. तसेच पुढील काळात शहरात साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून डांबरीकरणाची कामे केली जाणार असल्याबाबतही चर्चा झाली. त्यावेळी निविदा क्रमांक चारमध्ये राजकीय दबाव आणला जात असल्याचे पाटील यांना सांगण्यात आले. त्यांनी या सर्व निविदा प्रक्रियेची माहिती घेऊन नियमानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करा. जर कोणा राजकीय दबाव आणून त्यात बदल करून घेत असेल तर त्याची तक्रार माझ्याकडे करा. त्यावर कारवाई केली जाईल, असे पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील गोंधळ पाटील यांच्या कानावर घातलेला असताना काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही असेही सूत्रांनी सांगितले.

निविदा रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

प्रशासनाने मोठ्या रकमेच्या निविदा काढल्याने त्यासाठी पात्र ठरणारे मोजकेच ठेकेदार शहरात आहेत. त्यामुळे रस्त्याच्या निविदांमध्ये योग्य स्पर्धा झालेली नाही. यात स्पर्धा झाली असती तर पुणेकरांचे किमान २५ टक्के रकमेची बचत झाली असती. ठेकेदारांनी पूर्वीच्या हॉटमिक्स प्लांटचे लोकेशन, वैध करारनामा, बीड कॅपेसिटी, खरे अनुभव जोडलेले नाहीत. महापालिका आयुक्तांनी सर्व ठेकेदारांच्या पात्रतेची खातरजमा स्वतःच्या पातळीवर केली तर यातील गैरव्यवहार समोर येईल, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आयुक्तांकडे केली आहे.