देवेंद्र फडणवीसांचा टोला, “उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे
मुंबई, 10 मे २०२४ ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना माकड असं संबोधलं होतं. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसंच पराभव स्पष्ट दिसू लागल्याने उद्धव ठाकरे अशा प्रकारे बोलत आहेत असाही टोला फडणवीसांनी लगावला.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला होता. शरद पवारांनी लोकसभेनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना शिंदे आणि फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष विलीन होणार असल्याचं भाकीत बोलून दाखवलं होतं. त्यावरच बोलताना उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केला आहे.
“दिल्लीश्वरांची दोन चावीची माकडं, त्यांच्या हातात कोलीत सापडलंय, एक माकड आहे दाढीवालं… त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव उच्चारता येत नाही. माझं नाव घेताना त्यांच्या घशात बाठा अडकतो. त्यांच्या वडिलांचं आणि पक्षाचं ना एशंशि आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहे ते देगंफ… ज्याला तुम्ही काय म्हणता? ते भांग प्यायलेल्या माकडांसारखं बोलत आहेत. शिवसेना हा छोटा पक्ष आहे का? माझं त्या दोन्ही माकडांना सांगणं आहे की, बाप बदलण्याची गरज मला नाही, बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.
त्याला उत्तर देताना “उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना आता डॉक्टरची गरज आहे. ते रोज काहीतरी बदलत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करावे.”, असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. पुढे बोलताना त्यांना शिव्या देण्याशिवाय दुसरं सध्या काहीही सुचत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. जनतेनं त्यांना रिजेक्ट केलेलं आहे, त्यामुळे ते शिवीगाळ करण्यावर उतरले आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
“अजित पवारांनी शरद पवारांबरोबर पक्ष उभा केला. पण त्यांना बाहेर पडावं लागलं कारण त्यांना लक्षात आलं की आपल्याला पक्ष मिळणार नाही. आपल्याला पक्षात स्थान मिळणार नाही. सुप्रिया सुळेंनाच ते पक्षाची जबाबदारी मिळणार हे समजल्यामुळे ते बाहेर पडले. उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका करणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्याचा प्रकार आहे. तसंच संजय राऊत ही कोण व्यक्ती आहे ते मला माहीत नाही. उद्धव ठाकरेंनी ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मोदींवर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.