भाजपसोबत जागा वाटपाचा निर्णय लवकरच – सुनील तटकरे
पुणे, २० ऑगस्ट २०२३: ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत असल्याने आम्ही महायुतीत सहभागी झालो. त्यामुळे आगामी निवडणूका ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची संयुक्त समन्वय समिती महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा एकत्रित बसून निर्णय घेईल. त्यापूर्वी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा आम्ही आढावा घेतला असून आम्ही कोणत्या जागांबाबत आग्रही आहोत, याबाबतची आमची भूमिका संयुक्त समन्वय समितीसमोर मांडू’’, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. पक्षाच्यावतीने आयोजित कार्यक्रमानंतर तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महापालिकेचे महापौरपद व पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी दावा करत आहे, याबाबत पक्षाची काय भूमिका आहे, याबाबत तटकरे म्हणाले, ‘‘लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका अगोदर होणार असून त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. तिन्ही पक्षांच्या बैठकीमध्ये जागा वाटपाबद्दल निर्णय होईल. त्यानंतर महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी ही घटक पक्षांसमवेत एकत्रित निर्णय घेतला जाईल. त्यामध्ये जागा व पदांचे वाटप होईल’’
‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन बांधणी सुरू केली आहे. पुण्याच्या कार्यकारिणीच्या नियुक्तीपासून सुरवात केली आहे. लवकरच लवकरच प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली विभागवार नियुक्त्या, बैठकांचे वेळापत्रक तयार केले आहे’, असेही त्यांनी सांगितले. बीड येथील अजित पवार यांची सभा ही उत्तर सभा नसून तेथील विकासासंबंधी ही सभा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोदी यांनी ७० हजार कोटी रुपयांचा आरोप केल्यानंतर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला का, या प्रश्नाला उत्तर देताना तटकरे म्हणाले,‘‘या प्रकरणाची चौकशी झाली आहे, या प्रकरणात न्यायालयाने योग्य निर्णय दिला असून त्यावर अधिक बोलणे योग्य होणार नाही.’’
संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाने त्यांच्या फोटोचा वापर करू नये, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. याविषयी तटकरे म्हणाले, ‘‘‘पवार साहेब आमचे दैवत आहेत. त्यांचा फोटो वापरु नये, असे विधान केले आहे. त्याविषयी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमवेत चर्चा करून निर्णय घेऊ.’’
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप