महाविकास आघाडीशी चर्चा करूनच उमेदवारांचा निर्णय – जयंत पाटील
पुणे, ५ जून २०२३: लोकसभा निवडणुकांना अद्याप एक वर्ष अवकाश आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यानुसार इच्छुकही तयारीला लागले आहेत. आम्हीदेखील काही नावांवर चर्चा करत आहोत. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सोमवारी पुण्यात शिरूर, भिवंडी आणि जालना या लोकसभा मतदारसंघांसाठी आढावा बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री राजेश टोपे व जितेंद्र आव्हाड, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे आदी या बैठकीला उपस्थित होते.
आम्ही लोकसभा मतदार संघनिहाय पदाधिकार्यांच्या बैठका घेत चर्चा करत आहोत. या बैठकांमध्ये प्रभाग समित्या, बूथ समित्या आणि पदाधिकार्यांच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. कॉंग्रेस व शिवसेनाही (ठाकरे गट) त्यांच्या स्तरावर आढावा घेत आहे, असे पाटील यांनी सांगितले.
पुण्यात झालेल्या या बैठकीत शिरूर, जालना, भिवंडी या तीन मतदारसंघाची चर्चा झाली. शिरूरसाठी बहुतांश पदाधिकाऱ्यांनी विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याच नावाची शिफारस केली. जालना आणि भिवंडी मतदारसंघाबाबत काही नावे पुढे आली असली, तरी अंतिम निर्णय झालेला नाही,असे पाटील म्हणाले.
लोकसभेसाठी सांगलीच्या जागेवर जयंत पाटील आणि प्रतीक पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. त्याबाबत विचारले असता, उत्साही कार्यकर्ते वेगवेगळ्या नेत्यांची नावे सुचवितात, शेवटी अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील, असे पाटील यांनी नमूद केले.
आमच्यात मतभेद नाहीत – पाटील
राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे भासवले जात आहे. मात्र, आमच्यात कसलेही मतभेद नाहीत, तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येही मतभेद नाहीत. एकनाथ खडसे पक्षात चांगले काम करत आहेत, त्यामुळे ते पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
जालन्यातून राजेश टोपे ?
जालना लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय वाघचौरे, चंद्रकांत दानवे हे उमेदवार इच्छुक आहेत. मात्र, कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी केली. टोपे यांनी मात्र, आपण इच्छुक नसल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी दोघे तिघे इच्छुक आहेत. त्या पर्यायांवर चर्चा करण्यात आली. पण निर्णय झाला नाही. भिवंडीसाठी आत्ताच कोणी मला हा मतदारसंघ हवा अशी मागणी करू नका अशी स्पष्ट सूचना दिली आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.