दहा दिवसात महायुतीच्या जागा वाटपाची डेडलाईन: बावनकुळे यांनी दिली माहिती

नागपूर, २ सप्टेंबर २०२४ ः राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी महायुतीच्या नेत्यांची नागपुरात बैठक पार पडली. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली असून, येत्या दहा दिवसात जागा वाटपावर निर्णय होणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाच्यावतीने महाल येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आयोजित आंदोलनावेळी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जागा वाटपासंदर्भात ‘रामगिरी’वर बैठक पार पडली. या बैठकीत ज्या पक्षाच्या उमेदवारांमध्ये जिंकण्याची क्षमता आहे त्या पक्षालाच ती जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. कुणाला किता जागा मिळाव्यात हे महत्त्वाचे नसून राज्यात महायुतीच्या योजना पुढे नेण्यासाठी डबल इंजिनचे सरकार हवे आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत जागा जिंकण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळतील हे येत्या दहा दिवसात निश्‍चित होईल. सध्या कोणत्याही पक्षाकडून विशिष्ट जागेचा आग्रह करण्यात आलेला नाही. जागावाटपात महायुतीतील सर्वच घटक पक्षांचाही विचार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वादग्रस्त वक्तव्ये टाळा

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये तणाव असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत आणि भाजपचे प्रवक्ते हाके यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या युतीबाबत भाष्य केले. त्यामुळे अजित पवार यांच्या गटामध्ये नाराजी आहे. याबाबत बोलताना भाजपचे सर्व पदाधिकारी आणि प्रवक्त्यांना वाद होईल असे कुठलेही वक्तव्य न करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. यापुढे अशी वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.