भाजपचा खोटारडेपणा ओळखलेला बरा प्रकाश आंबेडकर यांचे टीका

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : कांदा निर्यातबंदी उठली की नाही, यावरून आता संभ्रम निर्माण झाला असून, नेमके काय, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. यात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार निशाणा साधलाय.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, देवाने मला राम मंदिर बांधण्याचा आदेश दिला. हा माझ्या अर्थाने सगळ्यात मोठा प्रचार आहे, हे मी मानतो. उरलेला खोटारडेपणा आपण ओळखलेला बरा’, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता कायम राहावी आणि भाव नियंत्रणात राहावेत यासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू केलेली निर्यातबंदी कायम असेल, असे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी स्पष्ट केले आहे. परंतु भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी कांदा निर्यातीबद्दल सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवत आहेत. त्यातून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे.

आता शेजारील देशांमध्ये कांदा निर्यात करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. त्यानुसार केंद्र सरकार नाफेड आणि केंद्रीय महामंडळाच्या माध्यमातून कांदा खरेदी करून निर्यात करणार आहे, अशी माहिती दिली. यात कांद्याबाबत नेमकी काय परिस्थिती आहे, यावरून संभ्रमाचे वातावरण आहे. या सगळ्या गोंधळात प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या संभ्रमीत धोरणांवर जोरदार हल्ला चढवला.

अद्याप आघाडीमध्ये ‘वंचित’ नाही

महाविकास आघाडी ‘इंडिया’ नसून, ती महाराष्ट्रात ‘महाविकास आघाडी’ आहे, असे सांगून महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला अद्यापही सहभागी करून घेण्यात आलेले नाही. आम्ही त्याची वाट पाहत आहोत, प्रकाश आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केले.

अगोदर महाविकास आघाडीत जागावाटप झाल्यानंतर आम्हाला हवे असलेल्या जागांसाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्याशी स्वतंत्र वाटाघाटी करू, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

नगर जिल्ह्यातील शिर्डीच्या जागेसाठी जिल्हा कार्यकारिणी आग्रही आहे. परंतु तेथून मी लढण्यास इच्छूक नाही. माझे सगळीकडे नाव आहे. शिर्डी मतदारसंघाची जागा ही शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. कार्यकारिणीने जोर लावल्यास ती जागा लढवण्यासाठी सक्षम उमेदवार देऊ शकतो, असेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.