कलम ३०४ वरून वाद पेटला: मोहोळ म्हणाले, ‘अभ्यास करून बोलत चला’ तर बिल्डरांची बाजू घ्यायला कोण कसे आले नाही अशी धंगेकरांची टीका

पुणे, २२ मे २०२४ : पुण्यामध्ये अल्पवयीन मुलाने पोर्से काढणे दोघांना चिरडल्याच्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागलेले आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करताना ३०४ ऐवजी ३०४ अ असे कलम लावून कायद्यातील पळवाट शोधली, त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला गेला, पुणेकरांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आता त्यात आमदार रवींद्र धंगेकर यांनी उडी मारली आहे. त्याला भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर देत ‘जरा अभ्यास करून बोलत चला’ अशा शब्दात त्यांच्यावर टीका केलेली आहे. त्याला परत धंगेकर यांनी खरबरीत उत्तर देत तरीच म्हणलं अजून बिल्डरची बाजू घ्यायला कोणी कसे आले नाही असं टोला मारला.

आमदार धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून फडणवीस यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केलेले आहेत. काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत.

१) घटना घडल्यानंतर पहिल्या एफआरआय मध्ये ३०४ चा उल्लेख नाही. अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का…? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का?
विशेषतः ही एफआरआय प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती.

२) पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर ३०४ अ सोबतच ३०४ हे कलम लावण्यात आले.
3) राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली एआरआय बदलल्या बाबत माहिती देण्यात आली नव्हती का..?
की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन व बिल्डर ला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का..?

आपलं पुणे शहर वाचविण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे.अधिकारी – मंत्री तर निघून जातील पण शहराला लागलेली ही किड आमच्या पुण्याच्या पिढ्यनपिढ्या बरबाद करण्याचे काम करेल. सतर्क रहा असे धंगेकर यांनी ट्विट मध्ये नमूद केले आहे.

याला मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. ‘लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच !

कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो.

मंगळवारीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम ३०४ हे पहिल्यापासून लावले आहे, म्हणजे मूळ एफआरआय दाखल करतानाच ! ही १९ तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी ! कलम ३०४ त्यात आधीपासूनच आहे.

त्यामुळे ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत, अशी टीका मोहोळ यांनी धंगेकर यांच्यावर केली.
त्यावर धंगेकर यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिले.

तरी म्हंटल बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत ? कदाचित अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले असतील म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे.

आता तुम्हाला एफआयआर आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का?
आमचं पहिल्या दिवसापासून एकच सांगणे आहे की एफआयआर मध्ये ३०४ लावण्यात आलेला नाही.का नाही लावला? सोबत पहिली एफआयआर कॉपी जोडतोय.नीट वाचून घ्या.

इथ २ कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत,त्यांच्या घरातली २ कमावते लोकं गेले आहेत त्यांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही अजूनही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय?

पुणेकर म्हणून तुम्ही पुण्याच्या जनतेसोबत राहाल अशी माझी अपेक्षा होती पण आतापासूनच बिल्डर अन पोलिसांच्या चरणी आपली निष्ठा वाहत आहात. ३-४ वाजेपर्यंत पोलिसांना माहिती असताना पब चालतात, तेव्हा कुठं गेलेलात ? गृहमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत.पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले असते तर हि घटना घडली नसती.