पीएफआयला महापालिकेचे काम दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपमध्ये वाद

पुणे, २७ सप्टेंबर २०२२: देशभरात पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया (पीएफआय) संघटनेच्या कार्यकर्त्यांना देशविघातक कृत्य केल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केल्यानंतर व पुण्यात झालेल्या घोषणाबाजीवरून संशय निर्माण झाल्यानंतर आता पुणे महापालिकेने पीएफआयला स्मशानभूमी व्यवस्थापनाच्या कामावरून वाद सुरू झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने तत्कालीन सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे. तर भाजपने ही नियुक्ती प्रशासनाने केली होती, आमच्या पत्रानंतर संस्थेकडून काम काढून घेण्यात आले असे सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर याप्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या नेत्यांना पीएफआय बद्दल माहिती होते म पण दोन वर्ष याची माहिती तपास यंत्रणांना दिली नाही, ही माहिती का दिली नाही असा प्रश्न करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी आरोप केले आहेत.
यावरून भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट करत राष्ट्रवादीवर पलटवार केला.

माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘कोरोना महामारीच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा संपूर्ण कारभार हा प्रशासनाच्या माध्यमातून चालतो. त्यातही सार्वजनिक आरोग्याचा जेव्हा प्रश्न येतो, त्यावेळी राज्य सरकारचे पूर्ण नियंत्रण या स्थानिक स्वराज्य संस्थांवर असते. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते आणि महापालिका आयुक्तांनी परस्पर निर्णय घेत त्यांच्या अधिकारातून पुण्यातील अनेक संघटनांना सर्वधर्मीयांच्या अंत्यविधीची परवानगी दिली होती. त्यात अनेक संघटनांचा समावेश होता, ज्यातील एक होती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया.

मात्र ही बाब आमच्या लक्षात येताच २ जून २०२० रोजी सदर संघटनेचे काम तात्काळ काढून घेण्यासंदर्भात सूचना देणारे पत्र आम्ही आयुक्तांना दिले. या पत्राची तातडीने दखल घेत दुसऱ्याच दिवशी PFI चे काम काढून घेण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आज सदर विषयाचे गलिच्छ राजकारण करत असून संबंध नसताना भाजपवरच आरोप करत आहे.

‘प्रशासक म्हणून राज्य सरकारच्या नियंत्रणात महापालिकेचे काम चालत असताना भाजपचा संबंध येतोच कसा? आता तर मला शंका आहे त्यावेळी राज्य सरकारनेच आयुक्तांना सांगून पीएफआय संघटनेला काम तर दिले नाही ना?

‘पाकिस्तान जिंदाबादच्या’ घोषणा दिल्या गेल्या त्यानंतर चार दिवस झाले हा विषय सातत्याने चर्चेत असताना, राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने अधिकृतपणे पीएफआय विरोधात भूमिका घेतली नाही, की निषेधही नोंदविलेला नाही. आता मात्र पीएफआयच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीला अचानक जाग आली आणि हे लगेच टीका करायला पुढे सरसावले. मग हीच संघटना देशविरोधी घोषणा देत होती, तेव्हा हे मग गिळून गप्प का होते?

चार दिवसातली तुमची देशभक्ती अवघ्या पुणेकरांनी पाहिली आहे आणि आजही तुम्हाला केवळ पीएफआयच्या समर्थनार्थच पुढे यायचे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. यापेक्षा तुम्ही पीएफआयला खुला पाठींबाच जाहीर करून टाका. कारण लोकांना देखील राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट कळली आहे. आमची भूमिका तेव्हाही पीएफआयच्या विरुद्ध होती आणि आजही आम्ही विरोधातच उभे आहोत.

यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन आयुक्तांना हे देखील सांगितले आहे की लवकरात लवकर देशविरोधी घोषणा देणाऱ्या सगळ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण देशद्रोही, देशविरोधी संघटना संपल्या पाहिजेत. यांना नेस्तनाबूत केले पाहिजे यावर आम्ही ठाम आहोत. देशद्रोह्यांना पाठीशी घालणे हा राष्ट्रवादीचा अजेंडा असेल आमचा नाही. नवाब मलिकांचे ताजे उदाहरण आपण सर्वांनी पाहिले आहे. देशद्रोह्यांबरोबर यांचे संबंध असतानाही शेवटपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून हटविले गेले नाही. तेव्हा राष्ट्रवादीने इतरांना देशभक्ती शिकविण्याच्या फंदात पडूच नये.

पाकिस्तान विरोधी घोषणा पीएफआयच्या घोषणा पाहता यांच्यामागे राष्ट्रवादीचीच ताकत असल्याचेही आमचे मत होऊ शकेल. तेव्हा राष्ट्रवादीने पीएफआयला छुपा पाठींबा देण्यापेक्षा खुला पाठिंबा जाहीर करून टाकावा.