काँग्रेसचे बंडखोर आबा बघून म्हणतात माझे निलंबन मागे घ्या

पुणे, ११ डिसेंबर २०२४. एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिला असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर होत असल्याने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनाच उभारी मिळाली शिवाय काँग्रेस विचारधारेच्या मतदारांची ‘व्होट बँक’ही राखता आली. त्यामुळे कोणतेही पत्र न देता आणि म्हणणे ऐकून न घेता पक्षातून निलंबन केले असल्यास ते तातडीने मागे घ्यावे आणि काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असल्याचे पत्र द्यावे अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

आबा बागुल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रशासन व संघटक उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्यासह निरीक्षक रमेश चेन्निथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्व नेत्यांना पत्र पाठवले आहे.

पर्वती मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे गेली पंधरा वर्षे आहे. मात्र त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार सलग तीन वेळा मोठ्या मताधिक्याचे फरकाने पराभूत झालेले आहेत. यंदाच्या निवडणुकीतही पुन्हा त्याच पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने पराभूत झालेले आहे. ही सर्व परिस्थिती पक्ष श्रेष्ठींकडे अनेक वेळा मी व इतरही पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेली होती व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आता हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे घेण्यासंबंधी प्रयत्न केल्याचेही कळविले होते. पण नेहमीप्रमाणे २१२ पर्वती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे (शरद पवार गट) यांच्याकडे जागावाटपात राहीला. परिणामी गेली अनेक वर्षे पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असूनही माझ्या उमेदवारी बाबत विचार केलाच गेला नाही.गेल्या तीस वर्षांपासून या मतदारसंघात वॉर्ड असो किंवा प्रभाग सलग निवडून येणारा काँग्रेस पक्षाचा एकमेव नगरसेवक आहे. शिवाय वार्डामध्ये नाविन्यपूर्ण विकासकामे तर केली तसेच पुण्यातील अनेक भागांमध्ये चांगली विधायक कामे केलेली आहेत.त्याबद्दल पक्षांमधील सर्व ज्येष्ठ व सक्रिय नेत्यांनी तसेच महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमधील नेत्यांनी माझी वेळोवेळी जाहीर प्रशंसा केलेली आहे. त्यामुळे यंदा पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी मिळणे अत्यंत आवश्यक होते. परंतु दुर्दैवाने तसे काही झाले नाही व सलग चौथ्या वेळी म्हणजेच वीस वर्ष मला आमदारकीची उमेदवारीपासून डावलण्यात आले आहे. परिणामी गेली वीस वर्षे या मतदारसंघात काँग्रेस पक्ष कमी होत आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या मतदारसंघात काँग्रेस पक्ष नावालाही राहणार नाही. या कारणामुळे केवळ नाईलाजाने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कायमस्वरूपी पक्षासमवेत राहावेत व काँग्रेसचे मतदार जपले जावेत या हेतूने मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला होता.याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले आहे.

शिस्तभंग नाहीच…

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेमध्ये व कायदा यामधील तरतुदींचा कोणताही विचार न होता मला नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार माझे खरे व योग्य म्हणणे ऐकून न घेता तसेच कोणतेही लेखी अथवा तोंडी खुलासा करण्याची संधी न देता तसेच मला पक्षातर्फे अधिकृतरित्या कोणतीही निलंबनाची नोटीस आजमितीपर्यंत कोणत्याही मार्गाने व कशाही प्रकारे अद्याप पर्यंत प्राप्त झालेली नसताना निलंबनाची माहिती प्रसार माध्यमांद्वारे समजली आहे व केवळ त्याच कारणाने मी आपणाकडे हा खुलासा माझे सर्व अधिकार अबाधित ठेवून प्राथमिक स्वरूपात केलेला आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध मी निवडणूक लढवली नाही. त्यामुळे मी पक्षाची शिस्तभंग केलेली नाही.तरी या कारणामुळे माझे पक्षाने निलंबन केले असल्यास ते तातडीने मागे घेऊन मला काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असल्याचे पत्र द्यावे असेही आबा बागुल यांनी पत्रात नमूद केले आहे.