पुण्यात काँग्रेसच; राष्ट्रवादीचा काय संबंध ?

पुणे, ४ जून २०२३: पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा सलग दोन वेळा पराभव झाला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा करण्यास सुरवात केली आहे. त्याचे पडसाद आज काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीत उमटले. पुणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसचीच ताकद जास्त आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघ सोडण्यावर तडजोड होऊच शकत नाही, अशी भूमिका शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडली. त्यावर पक्षाच्या नेत्यांनी ‘पुण्यात काँग्रेसचाच उमेदवार असणार राष्ट्रवादीचा काय संबंध. त्यांच्या मागणीकडे लक्ष न देता आपली संघटन बांधणी मजबूत करा. महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपचा पराभव नक्की आहे’ असे सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईमध्ये प्रदेश काँग्रेसतर्फे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसीय बैठक आयोजित केली होती. आज पुणे लोकसभा मतदारसंघावर चर्चा करण्यात आली. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा पराभव केला आहे. पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याने पुण्याची जागा राष्ट्रवादीला सोडावी अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतीच मांडली. एकीकडे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन भाजप विरोधात वज्रमूठ बांधत असताना पवार यांच्या वक्तव्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यापार्श्‍वभूमीवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह संग्राम थोपटे, विश्‍वजीत कदम, मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रमेश बागवे, कलम व्यवहारे, गोपाळ तिवारी, अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर आदी पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीमध्ये शहरातील पदाधिकाऱ्यांनी पुणे लोकसभेमध्ये काँग्रेसची ताकद कशी आहे. राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे १० नगरसेवक आहेत, दोन्ही पक्षाचे प्रत्येकी एक आमदार आहे. पण दोन उमेदवार अवघ्या पाच हजार मतांनी पडले आहेत. तर राष्ट्रवादीचा पर्वतीतील उमेदवार २५ हजारापेक्षा जास्त मतांनी पडला आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात आपलीच ताकद आहे, अशी भूमिका मांडण्यात आली. त्यास इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यास पाठिबां दिला. विश्‍वजीत कदम यांनीही तशी बैठकीत ठाम भूमिका मांडली.

सर्वांच्या भावांना ऐकून घेतल्यानंतर नाना पटोले यांनी ‘‘आपण पुणे लोकसभा मतदारसंघ सोडणार नाही. तेथे काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढवणार आहे. पक्ष संघटना मजबूत करून, सर्वांनी समन्वयाने काम करा, पक्ष देईल तो उमेदवार निवडू आणा’’ अशी सूचना पदाधिकाऱ्यांना केली.

मनातली खदखद केली व्यक्त
या बैठकीमध्ये काँग्रेसमधील गटबाजीवर चर्चा करताना पदाधिकाऱ्यांनी मनातील खदखद व्यक्त केली. पुणे कॅन्टोन्‍मेंट हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण आता आपल्याला तिथे का मताधिक्य मिळत नाही. सुरेश कलमाडी यांच्यानंतर तेच तेच चेहरे शहराचे नेतृत्व करत आहेत, तरुणांना संधी का मिळत नाही. महापालिकेसाठीही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे. पक्षाकडून आदेश आल्यानंतर एकदा आंदोलन केले जाते, पण त्यात सातत्य का नसते असे प्रश्‍न उपस्थित करत शहराचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे असे काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सुनावले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप