काँग्रेसचा ठाकरे गटाला दणका: लोकसभा जागा वाटपासाठी २०१९चे सूत्र अमान्य
मुंबई, ३ जून २०२३: लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट १९ जागा लढवणार असा दावा पक्षाचे नेते संजय राऊत करत असले तरी काँग्रेसच्या बैठकी मात्र या विरोधात भूमिका घेण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपात २०१९ चेनिकाल हा आधार होऊ शकत नाही अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी आजच्या बैठकीत मांडली. एखाद्या निवडणुकीत कमी जागा मिळाल्या म्हणजे पाच वर्षांनंतर संबंधित पक्षाची परिस्थिती तशीच राहत नाही. त्यामुळे पक्षसंघटन आणि स्थानिक
परिस्थिती पाहूनच जागावाटप व्हावे असा सूर या नेत्यांनी आळवला.
मुंबईत काँग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. प्रत्येक देशभर काँग्रेस हाच पर्याय असून भाजपविरोधात जनतेत मोठा असंतोष आहे. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर सर्वात जास्त ४८ जागा असणारे राज्य आहे. या प्रत्येक जागेवर विजयी होण्यासाठी काय करता येईल, याची व्यूहरचना या बैठकीत ठरविली जाणार आहे. मतदारसंघातील सद्य:स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ज्या मतदारसंघात पक्षाची स्थिती कमकुवत आहे, तिथे दौरे काढून पक्षसंघटन मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोकचव्हाण यांनीही २०१९ चे निकाल हा जागावाटपाचा निकष होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसची आघाडी आधीपासून आहे. पण आता या आघाडीत शिवसेनाही आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थानिक पातळीवर समन्वय महत्त्वाचा आहे. २०१९ ची परिस्थिती व आत्ताची परिस्थिती यात फरक आहे.
एखाद्या निवडणुकीत जागा कमी जिंकल्या म्हणजे तीच परिस्थिती कायम राहत नसते. ती बदलत असते. सर्व बाजूंचा विचार करून निर्णय घेतला जाईल. तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपचा पराभव करणे कठीण नाही. जागा वाटपावरून महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. आम्ही एकत्र राहून भाजपला पराभूत करू, असा इशाराही चव्हाण यांनी या वेळी दिला. दरम्यान, या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसची राज्यातील प्रत्येक मतदारसंघात संघटनात्मक ताकद आहे. काँग्रेस सर्व मतदारसंघांचा आढावा घेणार असला तरी त्याचा आघाडीच्या जागा वाटपावर काही परिणाम होणार नाही. भाजपचा
पराभव करणे हेच आमचे लक्ष्य असून या बैठकीनंतर मविआच्या बैठकीत पुढची रणनीती निश्चित केली जाईल.
राष्ट्रवादी रामटेकवर दावा सांगणार ?
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रामटेक लोकसभा मतदारसंघावर दावा केला जाणार आहे. या संदर्भात सोमवारी (ता. ५) मुंबई येथे आयोजित बैठकीमध्ये स्थानिक नेत्यांना सर्व डेटा घेऊन बोलाविण्यात आले आहे. या जागेवरून दोन्ही
काँग्रेसमध्ये बिनसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर्व विदर्भात राष्ट्रवादी काँग्रसचा एकही खासदार नाही.
गोंदिया-बुलडाण्यात माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यापूर्वी निवडून आले होते. प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर आहेत. ते या जागेवर दावा करण्याची दाट शक्यता आहे. पटोले याच जिल्ह्याचे असल्याने ते सहजासहजी ही जागा सोडणार नाहीत. त्यामुळे दुसरा पर्याय म्हणून रामटेक लोकसभा जागेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केली जाणार आहे. रामटेक लोकसभेमधील काटोल-नरखेड आणि हिंगणा असे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. काटोलमध्ये अनिल देशमुख यांचे वर्चस्व आहे. माजी मंत्री रमेश बंग, काही जिल्हा परिषद सदस्यही या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे
आहे. त्यामुळे इतर जागांच्या तुलनेत रामटेक लढणे सोयीचे असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघ मिळावा, याकरिता ही राष्ट्रवादीची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप