कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी वादाची ठिणगी

पुणे, ३१ जानेवारी २०२३: कसबा विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी अवघे 26 दिवस शिल्लक असली तरी काँग्रेसने गेल्या दोन आठवड्यापासून एकदाही उमेदवाराची चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला नाही. त्यावरून आता महाविकास आघाडीमध्ये वादाची ठणकी पडलेली आहे. त्याचेच रूपांतर आज राष्ट्रवादीने थेट कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवार उभा करण्यास चा निर्णय घेतला आहे. तर निवडणूक सोडून भारत जोडो यात्रेच्या समारोपासाठी गेलेले काँग्रेसचे नेते मंडळी जम्मू कश्मीरमध्ये अडकून पडल्याने त्यांना व्हिडिओ कॉल द्वारे बैठक घेण्याची नामुष्की आली.

आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. भाजपने उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठका घेतल्या, सर्वे केले, त्याचे रिपोर्ट नेत्यांपर्यंत देखील गेलेले आहेत. आता फक्त उमेदवार जाहीर करण्याची औपचारिकता बाकी आहे. एकीकडे भाजपने निवडणुकीच्या प्रचारासह सर्वत्र आघाडी घेतली असताना महाविकास आघाडीतील गोंधळ संपलेला नाही. शिवसेनेने ही या मतदारसंघावर दावा केलेला आहे. त्यातच काँग्रेसनेही हा त्यांचा पारंपारिक मतदारसंघ असल्याचे सांगितले आहे पण काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेना या तिन्ही पक्षांची एकत्र बैठक झालेली नाही.
हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे. अशी भूमिका घेत राष्ट्रवादीने निवडणुकीपासून अंग काढून घेतले होते. पण काँग्रेसकडून काहीच हालचाल होत नसल्याने आज अखेर राष्‍ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली.
यामध्ये काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवायची असताना काँग्रेसने चर्चा साठी कोणताही पुढाकार घेतलेला नाही. जर त्यांनाही निवडणूक गांभीर्याने घ्यायची नसेल आणि भाजपचा फायदा करायचा असेल तर आपण अशी निवडणूक लढवली गेली पाहिजे अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्यानुसार राष्ट्रवादीकडून इच्छुकांची यादी तयार करून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे पाठवली जाणार आहे. या बैठकीत इच्छुक म्हणून अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, वनराज आंदेकर, रुपाली पाटील, आण्णा थोरात, गणेश नलावडे, गोरख भिकुले आणि दत्ता सागरे यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. महाविकास आघाडीत आपल्याकडे हा मतदारसंघ घ्यावा, आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या,आपण निवडणूक जिंकू अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या माध्यमातून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यंकडे केली जाणार आहे.

राष्ट्रवादीने काँग्रेसचे विरोधात भूमिका घेतलेली असताना काँग्रेस पक्षामध्ये देखील अस्वस्थता वाढत आहे. निवडणूक अर्ज भरण्याची मुदत सुरू झालेली आहे. तरी देखील उमेदवारी बद्दल काही निश्चित होत नसल्याने काँग्रेसचे नेत्यांकडे तक्रार करण्यात आली. निवडणुकीच्या कामात कामकाज सोडून भारत जोडो यात्रेच्या समारंभासाठी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, निरीक्षक आमदार संग्राम थोपटे हे सर्वजण जम्मू-काश्मीरला गेले आहेत. मात्र त्यांना परत येण्यासाठी विमान मिळत नसल्याने ते तिथे अडकून पडलेत. एकीकडे निवडणुकीचे दिवस जवळ येत असताना दुसरीकडे नेते जम्मू मध्ये असल्याने पक्षांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर अखेर आज आमदार थोपटे यांना इच्छुकांसोबत व्हिडिओ कॉल द्वारे त्यांची मते जाणून घेण्याची नामुष्की आली. या चर्चेनंतर थोपटे हे त्यांचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करणार असून दोन तारखेला ते मुंबईत येणार आहेत.