मनसेच्या सोबत मुख्यमंत्र्यांची गुप्त खलबते
पुणे, २२ फेब्रुवारी २०२३ : कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रंगात आलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अजय शिंदे यांची गुप्त भेट झाल्याने भाजपा थेट मदत मिळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला असता तरी प्रचारापासून ते दूर झालेले आहेत. पण शिंदे यांची भेट झाल्यामुळे आता मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच पुणे दौरा केला. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यासोबत गुप्त खलबते झाली आहेत. अजय शिंदे यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी निवडणूक लढवली आहे, यामुळे या गुप्त बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हेदेखील यापूर्वी मनसेकडून कसब्यामध्ये लढले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे आणि अजय शिंदे यामधील ही गुप्त बैठक राजकीय वर्तुळात भुवया उंचवणारी ठरणार आहे.
त्याचप्रमाणे मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी हिंदुत्व आणि विकास या मुद्द्याला भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच पुढे घेऊन जात आहे आणि म्हणूनच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, तरीही मनसे कार्यकर्ते आतून धंगेकर यांचेच काम करीत असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री शिंदे आणि अजय शिंदे यांच्या गुप्त बैठकीमुळे धंगेकर यांना मनसेकडून मिळणारी छुपी रसद देखील बंद होईल, अशी चर्चा आहे.