राज्यात सत्ताबदल गरजेचाच, एकजूट कायम ठेवा: शरद पवारांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन
मुंबई, १७ ऑगस्ट २०२४ ः आपल्याला फक्त महाराष्ट्राचा विचार करून चालणार नाही. निवडणुका झाल्या पण देशावरचं संकट अजून गेलेलं नाही. राज्याचं चित्र बदलायचं असेल तर सर्वांनी एकत्रित लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मी खात्री देतो की सर्व सहकाऱ्यांना सन्मानाने बरोबर घेऊ. एकविचाराने सामोरे जाऊ. विजयी करण्यासाठी प्रयत्न राहतील. एकजूट कायम ठेवा कष्ट करण्याची तयारी ठेवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आज महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जिंकायच्या असतील तर एकजूट कायम ठेवा असे आवाहन केले.
शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आपल्याला काही प्रमाणात यश आलं. याचा अर्थ संविधानावरचं संकट गेलं असा अर्थ काढू नका. आज देशाची सूत्रं ज्यांच्या हातात आहे त्यांना लोकशाहीतील संस्थांबाबत आस्था नाही. देशाच्या संसदेत आपण पाहतो पंतप्रधान किती प्रतिष्ठा ठेवतात हे तुम्हाला येथे उपस्थित असलेले राज्यसभेचे सदस्य तुम्हाला सांगतील. लोकसभा आणि राज्यसभेचं अधिवेशन आताच झालं. यातील एकही दिवस मोदी सदनात आले नाहीत.
सरकारकडून राहुल गांधी-खर्गेंचा अपमान
जशी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा ठेवली गेली पाहिजे तशीच विरोधी पक्षनेत्याचीही ठेवली गेली पाहिजे. पण स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात आपण पाहिलं लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला (राहुल गांधी) थेट पाचव्या रांगेत बसवण्यात आलं. मीही काही काळ विरोधी पक्षनेता होतो त्यावेळच्या सरकारने माझी बैठक व्यवस्था कॅबिनेट मंत्र्यांच्या ओळीत केली होती. भाजप नेत्या सुषमा स्वराज विरोधी पक्षनेत्या असताना त्यांना स्वातंत्र्यदिनी मंत्र्यांच्या ओळीत बसण्याची व्यवस्था होती. पण आताच्या सरकारने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची प्रतिष्ठ ठेवली नाही. याच कारण लोकशाही संस्थांवर विश्वास नसलेले राज्यकर्ते आज दिल्लीच्या सत्तेत आहेत, अशी टीका शरद पवार यांनी केली.
महाराष्ट्रात सत्तांतराशिवाय पर्याय नाही
आता राज्यात दोन महिन्यात निवडणुका होतील. कमी दिवस राहिले आहेत. या काळात एका विचारानं सामान्य जनतेत जा. जागरुकता आणा. राज्यातील आताचं चित्र बदलायचं असेल तर सरकार बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सरकार बदलणं हाच एककलमी कार्यक्रम ठेवला पाहिजे. आताच्या राज्यकर्त्यांकडून चुकीच्या पद्धतीने सत्ता वापरली जात असल्याची अनेक उदाहरणं आहेत.
या सरकारने जनसुरक्षा कायदा विधिमंडळात आणला होता. आमच्या नेत्यांनी कायदा थांबवण्याची मागणी केली. आता तो थांबला. या कायद्यात काय होतं तर तुम्ही एकट्याने निदर्शने केली तर तुम्हाला पाच ते सात वर्षे कारावासाची तरतूद या कायद्यात होती. अशा अनेक तरतुदींतून मुलभूत अधिकार उद्धवस्त करण्याची या सरकारची भूमिका होती. परंतु, जागरुक विरोधी पक्षाने सरकारचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही.
मी तुम्हाला खात्री देतो की आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व सहकाऱ्यांना सन्मानाने बरोबर घेऊ. एकविचाराने सामोरे जाऊ. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न राहतील. एकजूट कायम ठेवा वाटेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवा असे आवाहन शरद पवार यांनी मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना केले.