महायुतीत १७६ जागांवर एकमतः चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर, ३ सप्टेंबर २०२४ः १७६ जागांवर आमचे एकमत झाले आहे. उर्वरित जागांबाबत येत्या दहा दिवसांत निर्णय होईल, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम नागपूर येथे घेण्यात आला. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बहुतांश नेते शनिवारी नागपूरमध्ये मुक्काम होती. यावेळी तीनही प्रमुख नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाली. बावनकुळे यांनी १७६ जागेवर आमच्या कुठलेच मतभेद नसल्याचे सांगितले. बावनकुळे म्हणाले, ज्या ठिकणी ज्या पक्षाचे चांगले आणि सक्षम उमेदवार आहेत तेथे एक पाऊल आम्ही मागे घेऊ. विरोधकांना रोज काही तरी आरोप करायचे असतात. आता त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात येणार असल्याचा आरोप केला आहे. ते रोज खोटे बोलत आहेत. २६ नोव्हेंबरनंतर विधानसभेची निवडणूक पुढे ढकलता येत नाही. त्यापूर्वी विधिमंडळ गठित करावे लागणार आहे. त्यानुसार विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
एकनाथ खडसे काय बोलले हे मला माहिती नाही. त्यांनी लोकसभेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. रक्षा खडसे यांना मदत केली. पुढच्या काळात ते आमच्या सोबत राहतील, असा विश्वास आहे. यावेळी बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री होण्यासाठी ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना हात जोडत असल्याचे सांगितले. जरांगे पाटील यांचा आम्ही आदर करतो. सुरुवातीला त्यांचे आंदोलन सामाजिक होते. आता ते सकाळपासून संध्याकाळी पर्यंत देवेंद्र फडणवीस यांना संबंध नसताना टार्गेट करतात. मराठा समाजावर सगळ्यात जास्त अन्याय शरद पवार यांनी केला. त्यांचे ते नाव घेत नाहीत. त्यांच्या सामाजिक आंदोलनाची भूमिका बदलली आहे. ते आता राजकीय होत असल्याचे दिसून येते असेही बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरेबद्दल मला दया येते. ते दोन दिवस दिल्लीत राहून राहुल गांधीना मुख्यमंत्री पदाची भीक मागतात. शरद पवारांना भेटून हात जोडतात. आमच्या सरकारच्या काळात ते सांगून काम करत होते. प्रवक्ते म्हणतात उद्धव ठाकरे हा मुख्यमंत्री चेहरा असल्या शिवाय निवडणूक होऊ शकत नाही. त्यांना आज मुख्यमंत्री होण्यासाठी हात जोडण्याची वेळ आली. ते कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, अशी स्थिती आज त्यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आणली असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.