भीमा कोरेगाव येथे जाऊ न शकलेल्या चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाचे मान्य आभार
पुणे, २ जानेवारी २०२३ : महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात दलित संघटना आक्रमक आहेत. त्यामुळे त्यांनी एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ अभिवादन करण्याचे टाळले होते. विजयस्तंभ येथे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, पीएमपीएल यांच्यातर्फे चोख व्यवस्था करण्यात आलेली होती. हा कार्यक्रम शांततेत पार पडला त्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. तर भीमा कोरेगाव येथे जमलेल्या लाखो समुदायास धन्यवाद देत त्यांचे आभार मानले आहेत.
महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर दलित कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडावर शाई फेकून या घटनेचा वक्तव्याचा निषेध केला होता. एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे मोठ्या संख्येने दलित बांधव एकत्र येतात. पालकमंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील हे त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जाणार होते, पण ते आल्यास त्यांच्यावर शाई फेक केली जाईल असा इशारा देण्यात आल्याने चंद्रकांत पाटील यांनी तेथे जाणे टाळले होते व घरातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व विजय स्तंभाला अभिवादन केले. शाई फेकीला मी घाबरत नाही छातीवर गोळ्या सुद्धा झेलायला तयार आहे. मात्र मी भीमा कोरेगावला आल्याने दंगलीची स्थिती निर्माण झाल्यास त्यात सामान्य नागरिकांना नाहक त्रास होईल त्यामुळे मी भीमा कोरेगाव येथे येणार नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार द्वारे स्पष्ट केले होते.
भीमा कोरेगाव येथील कार्यक्रम झाल्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.पुणे जिल्ह्यातील पेरणे येथील जयस्तंभ अभिवादन सोहळा 1 जानेवारी 2023 रोजी उत्साहात झाला. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे आणि अभिवादनासाठी आलेल्या लाखो अनुयायांच्या सहकार्यातून शिस्तबद्ध अभिवादन सोहळा संपन्न झाला. याबद्दल जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, आयोजनात सहकार्य करणाऱ्या विविध संस्था-संघटना, सर्व अनुयायी आणि स्थानिक ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन.
आपण सर्वांनी एकजुटीने हा सोहळा यशस्वी केला. प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले. महिलांचेही विशेष आभार मानतो. बंदोबस्तासाठी तैनात महिला पोलिस असोत किंवा आरोग्य कर्मचारी या सर्वांनी कर्तव्य आणि सेवाभावनेने आपापली जबाबदारी यशस्वी केली.
त्यासोबतच आरोग्य, स्वच्छता विभागाचे कर्मचारी, पीएमपीएमएलचे सर्व चालक-वाहक, वाहतूक शाखा, पोलिस कर्मचारी, राज्य राखीव दलाचे कर्मचारी अशा विविध विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही कर्तव्य चोख बजावलं. लाखो अनुयायी आणि स्थानिक ग्रामस्थांचंही उत्तम सहकार्य मिळालं. ग्रामस्थांनी स्वागताची परंपरा आणि संस्कृती छान जपली आहे. हा सोहळा उत्तम नियोजन, अनुयायांची शिस्त आणि सद्भावना, ग्रामस्थांचं प्रेम आणि सहकार्य, प्रशासनातील सर्व संबंधित विभागांच्या समन्वयाचं उत्तम उदाहरण म्हणून लक्षात राहील, असे पाटील यांनी नमूद केले आहे.