नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत खासदाराच्या मुलाला संधी
नांदेड, १७ ऑक्टोबर २०२४ ः नांदेड आणि वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आलीयं. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून बड्या नेत्याला नांदेड पोटनिवडणुकीत संधी देण्यात आलीयं. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. यासंदर्भात काँग्रेसकडून एक्सवर प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलंय. रविंद्र चव्हाण हे स्व. खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव आहेत.
लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण निवडून गेले होते. त्यानंतर चव्हाण यांचं निधन झालं. चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण यांच्याच नावाची चर्चा सुरु होती. अखेर आज काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून काँग्रेसकडून अधिकृत घोषणा करण्यात आलीयं.
नांदेड जिल्ह्यातील काही राजकीय घराणी राजकीयदृष्ट्या बाद झाल्याचे दिसत असताना ज्या घराण्यांचा दबदबा अद्यापही कायम आहे, अशा नायगावच्या अमृतराव चव्हाण यांच्या मोठ्या घराण्यातील वसंतराव हे एक प्रतिनिधी. त्यांचे वडील बळवंतराव जिल्ह्याच्या राजकारणात दीर्घकाळ कृतिशील राहिले. आमदारकीचा त्यांचा वारसा वसंतरावांनी पुढे चालविला आहे.
वसंत चव्हाण यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु, तेथील डॉक्टरांनी त्यांना हैदराबाद येथे जाण्यास सांगितले. त्यामुळे एअर अॅब्युलन्सने त्यांना हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. किम्स रुग्णालयात वसंत चव्हाण यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र, आजाराशी झुंज सुरु असतानाच वसंत चव्हाण यांचं निधन झालंय.