लसीकरणानंतर लगेचच सीएए लागू करणार, अमित शाह यांचे मोठे वक्तव्य

दिल्ली, ०२/०८/२०२२: करोना लसीकरण मोहीम संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी अमित शाह यांच्या भेटीसाठी मंगळवारी संसदेत पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिल्याची माहिती दिली.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत पश्चिम बंगालमधील भाजपाच्या कामकाजाबाबत चर्चा केली. या भेटीनंतर बोलताना सुवेंदू अधिकारी यांनी, अमित शाह यांनी करोना लसीकरण मोहीम संपल्यानंतर प्रलंबित असलेला नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाईल असे आश्वासन दिल्याची माहिती दिली.

 

सत्ताधारी तृणमूल काँग्रेससोबत सुरु असलेल्या राजकीय लढाईसंबंधीही सुवेंदू अधिकारी यांनी मुद्दे मांडले. आपण अमित शाह यांच्याकडे भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करण्यासाठी तृणमूलच्या १०० नेत्यांची यादी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.