ग. दि. माडगूळकर स्मारकाचे काम वर्षात पूर्ण करा- पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील
पुणे, 04 जानेवारी 2023: महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेले थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे काम एका वर्षात पूर्ण करावे; त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा प्रकिया सुरु करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी दिले.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी ग.दि. माडगळूकर यांच्या नियोजित स्मारकाला भेट देवून अधिकाऱ्यांकडून स्मारकाच्या कामाबाबत माहिती घेतली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त (विशेष) आयुक्त विकास ढाकणे, अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, गदिमा स्मारकाच्या मूळ इमारतीचे काम आधी पूर्ण करणे आवश्यक आहे. सुरु असलेल्या प्रदर्शन केंद्राच्या कामासोबत स्मारकाचे कामही सुरु करावे आणि पुढील वर्षाच्या गुढी पाडव्यापर्यंत ते पूर्ण करावे. कामासाठी चांगली क्षमता असलेल्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात यावी. काम पूर्ण करण्यासाठी त्याला प्रोत्साहनात्मक सुविधा देण्यात याव्यात. स्मारकाच्या आतील सजावटीचा आराखडा तयार करताना गदिमांच्या कुटुंबियांशी चर्चा करावी व पुढील आठवड्यात त्याचे सादरीकरण करण्यात यावे. गदिमांच्या कार्याला साजेसे असे स्मारक उभे राहील याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी श्री. ढाकणे यांनी स्मारकाच्या कामाबाबत माहिती दिली. कोथरुड मध्ये तीन मजली भव्य स्मारक उभारण्यात येणार असून बांधकामाचे क्षेत्रफळ ३ हजार २३०.७८ चौरस मीटर एवढे असणार आहे. पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर पाच विविध दालने आणि दुसऱ्या मजल्यावर प्रायोजित रंगभूमीसाठी नाट्यगृह नियोजित आहे. एक्झिबिशन सेंटरच्या स्वंतत्र इमारतीचे क्षेत्रफळ ८ हजार ५८०.३२ चौरस मीटर असून त्याचे काम सुरु करण्यात आले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.