“बंटी पाटील ९६ कुळी पाटील नव्हे, मनोरुग्ण पाटील” – धनंजय महाडिकांची घणाघाती टीका
कोल्हापूर, १४ एप्रिल २०२३: श्री छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज बंटी पाटील यांच्या गटातील २७ उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आलं होते. त्यानंतर कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखे लढा, बावड्याचा पाटील कधी मागे पडणार नाही, असं आव्हान बंटी पाटील यांनी महाडिक गटाला दिलं होतं. याला आता धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर देत हा पाटील ९६ कुळी पाटील नाही तर मनोरुग्ण पाटील आहे अशी घणाघाती टीका केली आहे.
धनंजय महाडिक म्हणाले, “समोर उभारणाऱ्यांना निवडणूक लढण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण, बंटी पाटलांचा एकही टन ऊस कारखान्यात येत नाही. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी सहभाग घ्यायला नको होता. ते सगळीकडे सांगत आहे, मी ९६ कुळी पाटील आहे. सर्वजण ९६ कुळी पाटील आहेत. पण, ते मनोरुग्ण पाटील आहेत.”
“फक्त विरोधासाठी विरोध, द्वेषाने पछाडलेले, सूडबुद्धीने महाराष्ट्रात एकमेव नेता कोण राहिला असेल, तर हे मनोरुग्ण पाटील आहेत. बंटी पाटील कोल्हापुरला लागलेला शाप आहे. १५ वर्षे आमदार, ८ ते ९ वर्षे मंत्री होते. त्यांनी कोल्हापुरचा काय विकास केला? सतेज पाटील कोल्हापुरला लागलेला शाप नाहीतर शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळही आहेत. ही निवडणूक एकतर्फी होत, बंटी पाटलांच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्क जप्त होणार आहे,” असं भाकीतही धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं आहे.
माजी आमदार अमल महाडिक म्हणाले, “महादेवराव महाडिक यांनी २७ वर्षे हा कारखाना सभासदांचा ठेवला. कारखान्याचा ७/१२ छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानाच्या नावाने आहे. बंटी पाटलांनी कोणाचे तरी ऐकून तोंडावर पडू नये. आम्ही ३७ वर्षाचा अहवाल तुम्हाला दाखवतो, तुम्ही एक वर्षाचा दाखवा. तुमची भाषा मग्रुरीची असून, खोटारडेपणा हे तुमचं सूत्र आहे,” असं टीकास्र अमल महाडिक यांनी सोडलं.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप