विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती तयार
पुणे, २२ जुलै २०२४ ः लोकसभा निवडणुकीत भाजपला आलेल्या अपयशानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने पन्ना प्रमुख, बूथ समितीपासून ते जिल्हाध्यक्ष, विधानसभा विस्तारक अशा प्रकारची रचना करण्यात आली आहे. या रचनेनुसार पक्षातील विधानसभा, महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून निवडणुकांमध्ये बदल करण्याची रणनीती भाजपने आखली आहे.
रविवारी म्हाळुंगे येथील क्रीडा संकुलात पार पडलेल्या भाजपच्या महाअधिवेशनामध्ये पक्षाचे सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी पक्षाच्या रणनीतीची माहिती उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे भाजपची नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बोलावण्यात आले होते. त्यामध्ये विधानसभा निवडणुकीची भाजपची काय दिशा असेल, याबाबत चर्चा झाल्याचे शिवप्रकाश यांनी सांगितले.
* अशी आहे भाजपची विधानसभा निवडणुकीची तयारी
रेल्वेमंत्री आश्विनकुमार वैष्णव यांच्यावर मुंबई व कोकणची जबाबदारी असणार आहे. तर शिवप्रकाश व भूपेंद्र यादव यांच्याकडून उर्वरित महाराष्ट्राची जबाबदारी असणार आहे. त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील काम पाहणार आहेत. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी उपयोग केला जाणार आहे. जिल्हाध्यक्ष, मोर्चाप्रमुखांवर आपापल्या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींची निवड करायची आहे. त्यानंतर प्रदेश, जिल्हा, बूथ समिती पातळीवर काम केले जाणार आहे. सुपर वॉरीयरच्या ऐवजी आता शक्ती केंद्र प्रमुख म्हणून काम केले जाणार आहे. त्यासाठी शक्ती केंद्र मजबूत केले जाणार आहे. राजकीयदृष्ट्या सक्षम कार्यकर्त्यांची, प्रत्येक मंडळाच्या प्रभारीची निवडक केली जाणार आहे. पंचायत/वॉर्डस्तरावरील कार्यकर्त्यांना वॉर्ड प्रभारी नियुक्ती केली जाणार आहे. विविध समाज घटकांसह शिक्षण, आरोग्य, धार्मिक, सांस्कृतिक, कॉर्पोरेट अशा विविध क्षेत्रांमधील संपर्कासाठी समन्वयकांची निवड केली जाणार असल्याचे सांगत शिवप्रकाश यांनी मार्गदर्शन केले.
मतदारयाद्यातील नावे गायब होणे गांभीर्याने घ्या – शिवप्रकाश
लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे गायब झाली होती. हे गांभीर्याने घेऊन बुथनिहाय मतदारसुची पाहून प्रत्येक मतदाराची नाव मतदारयादीत येईल याची काळजी घ्या. त्यासाठी कार्यकर्त्यांची निवड करून मतदारयाद्यांमध्ये नवीन नावे जोडणे, मृत व्यक्तींची नावे काढणे, स्थलांतरित झालेल्यांच्या नावांमध्ये सुधारणा करणे यासाठी विशेष प्रयत्न करा, अशा स्पष्ट सूचना शिवप्रकाश यांनी यावेळी दिल्या.