पुण्यात लागले भाजपचे पोस्टर कर्वे पथ ते कर्तव्यपथ, मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचा विश्वास

पुणे, १३ मे २०२४: पुणे लोकसभा मतदारसंघात या मतदानाची अंतिम टक्केवारी अद्याप जाहीर झालेली नसताना भाजपच्या माजी नगरसेवकांनी मात्र उमेदवार मुरलीधर मोहोळ हे खासदार होणारच असा भला मोठा फ्लेक्स लावला असून त्यावर कर्वे पथ ते कर्तव्य पथ असा विजयाचा मार्ग दाखविण्यात आलेला आहे. त्यामुळे याचा निकाल काय लागणार याकडे लक्ष लागले आहे.

भाजपचे माजी नगरसेवक सनी निम्हन यांनी पाषाण परिसरात हा फ्लेक्स लावला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आज शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. सायंकाळी पाच पर्यंत ४४.९ टक्के मतदान शहरात झालेले आहे. सकाळी मतदानाला उत्साहात सुरुवात झालेली असताना दुपारनंतर मात्र मतदानाचा वेग कमी झाल्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी दिसत आहे.

त्यातच भाजपला माणनारा मतदार वर्ग असणाऱ्या कोथरूड, पर्वती आणि कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाल्यामुळे भाजपला विजयाची खात्री असल्याचे भाजपकर्त्यांकडून सांगितले जात आहे. त्याचमुळे सनी निम्हण यांनी पाषाण परिसरात फ्लेक्स लावले आहे.

“फ्लेक्स वरती खासदार मुरलीधर मोहोळ यांना हार्दिक शुभेच्छा
कर्वे रोड ते कर्तव्य पथ”

असा उल्लेख माजी नगरसेवक सनी निम्हन यांनी करत फ्लेक्स लावला आहे.