इंडिया च्या बैठकीमुळे भाजप विचलित; त्यामुळेच एक देश एक निवडणुकीचा प्रयोग सुरू – विजय वडेट्टीवार यांची टीका
मुंबई, १ सप्टेंबर २०२३: महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘इंडिया’च्या तिसऱ्या बैठकीनंतर केंद्र सरकार विचलित झालं आहे. यामुळेच एक देश, एक निवडणूक हा प्रयोग राबवण्याचा विचार आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले, “‘इंडिया’च्या तिसऱ्या बैठकीनंतर केंद्रातील सरकार विचलित झालं आहे. ‘एक देश, एक निवडणूक’साठी केंद्र सरकारला बहुमताचा आकडा गाठणं शक्य आहे का? सध्या १२ राज्यातील मुख्यमंत्री विरोधी पक्षांचे आहेत. अशा स्थितीत त्यांच्याशी चर्चा करणं आणि बहुमताचा आकडा गाठणं सरकारला शक्य आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखालील समितीला यावर काम करण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लागेल. तोपर्यंत डिसेंबर महिना उजडेल.
“१२ राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय आणि त्या राज्यातील विधानसभेच्या ठरावाशिवाय संविधानात बदल करता येत नाही. असं करायचं असेल तर एक तृतीयांश बहुमत लागतं. तो आकडा भाजपाकडे आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतो. अदाणी प्रकरणावर राहुल गांधींनी जो बॉम्ब टाकला होता, त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत”, असंही वडेट्टीवार म्हणाले.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, ‘इंडिया’च्या माध्यमातून विरोधकांची ताकद एकत्रित होत आहे. त्याला घाबरुन भाजपात अशाप्रकारचा विचलितपणा निर्माण झाला आहे. यामुळेच सिलिंडरचा दर दोनशे रुपयांनी कमी झाला. हा त्याचाच एक भाग आहे. तीन महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे दर कमी झाले होते. मग तेव्हाच केंद्राने गॅसचे दर कमी का केले नाहीत? आता डिझेल ६० रुपयांवर आणतील, ही शक्यता आहे. पराजय पुढे दिसल्यानंतर हे सगळे विचलित झाल्याचे प्रयोग आहेत, अशी परिस्थिती नाकारता येत नाही.