पुण्यात भाजप काँग्रेस वाद पेटला; काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप कार्यालयावर मोर्चा

पुणे १ जून २०२३: देशपातळीवर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये वाद टोकाला गेले असताना त्याची ठिणगी पुण्यात देखील पडलेली दिसून येत आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी “पुण्यातील काँग्रेस भवन म्हणजे राजवाडा आहे काँग्रेसने पुण्यासाठी काहीही केलेले नाही.” अशी टीका केली त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले. पुण्याच्या काँग्रेस भवनच्या इतिहासाची पुस्तिका मुळीक यांना देण्यासाठी म्हणून त्यांनी मोर्चा काढला. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील घडामोडी टळल्या.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नुकतीच नऊ वर्षे पूर्ण झालेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसरी टर्म पूर्ण होत आली असून पुढच्या मे महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नववर्षाच्या कालावधीत राबविल्या गेलेल्या अनेक योजना, प्रकल्प यासह घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेली प्रतिमा, दहशतमुक्त वातावरण याची माहिती देऊन त्याचा प्रचार प्रसार करण्यावर भर दिला जात आहे.

त्यावरून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी ट्विटर वरून “गेल्या नऊ वर्षात भाजपने होण्यासाठी काहीही केलेले नाही”, अशी टीका केली. त्याला प्रतिउत्तर म्हणून जगदीश मुळीक यांनी ट्विटरवरून “भाजपने विकास कामे केली ती लोकांसमोर आहेत. पण पुण्यातील काँग्रेस भवन हे राजवाडा आहे. राजवाडा बांधण्यापलीकडे काँग्रेसने पुण्यात काही केले नाही” अशी टीका केली. मुळीक यांची टीका काँग्रेसच्या जिव्हारी लागल्याने कार्यकर्ते आक्रमण झाले. त्यांनी आज भाजपच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आणि मुळीक यांना काँग्रेस भवन ची माहिती असणारी छोटीशी पुस्तिका भेट देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि मुळीक यांची भेट होऊ शकली नाही.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप