मनसेकडून लोकसभेला बाबर की मोरे, पक्षांतर्गच संघर्ष जोरात

पुणे, ७ फेब्रुवारी २०२४:  पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झालेली असताना मनसेतही इच्छुकांमध्ये धुसफूस सुरू आहे. वसंत मोरे की साईनाथ बाबर अजून ठरलेलं नाही मात्र वसंत मोरे यांनी व्हॉट्सअपला ठेवलेल्या एका स्टेटसची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. “कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच पण, मी पट्टीचा गारुडी आहे” अशा आशयाचं स्टेटस आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकेरे यांनी मनसे नेते विद्यमान शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या खासदारकीचे संकेत दिले होते. त्यामुळे मोरे यांचे हे स्टेटस नेमके कुणाला उद्देशून आहे, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

तसं पाहिलं तर वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोघांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी दोघांनीही पक्षनेतृत्वाला गळ घातली होती. त्यानंतर वसंत मोरे यांनी शहरभर बॅनरबाजी करत आपणच मनसेचे लोकसभेचे उमेदवार असल्याचे सांगितले होते. तर दुसरीकडे साईनाथ बाबर यांनीही आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले होते.

वसंतला मला दिल्लीला पहायचं आहे असे वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. तसेच साईनाथ बाबर दिल्लीला गेला तर दुधात साखर पडेल असेही वक्तव्य त्यांनी बाबर यांच्या कार्यक्रमात केले होते. या वक्तव्यानंतरच वसंत मोरे यांनी सूचक स्टेटस ठेवल्याची चर्चा सुरू आहे. “कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच पण, मी पट्टीचा गारुडी आहे. योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार” असे मोरेंनी लिहिले आहे.

पुण्यात मनसेचा उमेदवार कोण असेल याची चाचपणी पक्षाच्या वरिष्ठांकडून केली जात आहे. काही जणांच्या नावांची चर्चाही झाली आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पुणे लोकसभेचे प्रभारी आहेत. त्यांनी पु्ण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. या बैठकांचा अहवाल राज ठाकरे यांना देण्यात आला आहे. यानंतर आता पुणे लोकसभेचं तिकीट कुणाला मिळणार हे एक कोडं बनलं आहे. वसंत मोरे की साईनाथ बाबर यांपैकी कुणाला तिकीट मिळणार की ऐनवेळी तिसराच उमेदवार रिंगणात येणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.