आठवलेंची नाराजी दूर: भाजपने दाखवले विधानपरिषद अन मंत्रीपदाचे गाजर
मुंबई, १ नोव्हेंबर २०२४ ः राज्यात विधानसभेचं बिगूल वाजलं आहे, जागा वाटप होऊन उमेदवारी अर्ज देखील दाखल झाले आहेत. आता प्रचारात रंगत आली आहे, मात्र तरी देखील महायुती आणि महाविकास आघाडीमधील काही घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून अजूनही नाराजी दिसून येते आहे. याचा फटका हा निवडणुकीत बसू शकतो त्यामुळे बड्या पक्षांकडून मित्र पक्षांच्या मनधरणीचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या आरपीआयला राज्यात केवळ एकच जागा मिळाली आहे. यावर आता पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष असला तरी ही निवडणूक महायुतीसाठी अत्यंत सोपी आहे. लोकसभेला महाराष्ट्रात नरेटीवमुळे आमचं मोठं नुकसान झालं. तरी लोकसभेला आम्हाला झालेलं मतदान हे मोठं आहे. महायुतीला विधानसभेत 170 पर्यंत जागा मिळतील. आरपीआयला एकच जागा मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमधे नाराजी होती, मात्र मी ती दूर केली आहे. विधानसभेला जरी एक जागा असेल तरी आम्हाला एक विधानपरिषद आणि सत्ता आल्यावर मंत्रिपद देण्याचं आश्वासन फडणवीस आणि शिंदे यांनी दिल्याचा दावा आठवले यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महायुतीचे 17 उमेदवार लोकसभेला जिंकले त्यात आमच्या पक्षाची मतं देखील आहेत. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी भाजप उमेदवार शायना एनसी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद सावंत हे तसे चांगलं कल्चर असलेले खासदार आहेत, शायना एनसी यांना माल म्हणणे ही गंभीर बाब आहे. त्यांचा अपमान म्हणजे सगळ्या महिलांचा अपमान आहे. उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करावी. सोबतच महिला आयोगाने देखील याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.