अशोक चव्हाण म्हणतात दोन दिवसात भूमिका स्पष्ट करेन

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४ ः ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा (विधानसभा सदस्यत्व) राजीनामा दिला आहे. दरम्यान, अशोक चव्हाण आता भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपा त्यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा सध्या रंगतेय. या सर्व प्रकारच्या चर्चांवर स्वतः अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जन्मापासून मी काँग्रेसमध्येच आहे, पण आता मला अन्य पर्यायांचा विचारा करावा असे वाटले. त्यामुळे मी राजीनाम दिला आहे. माझी पुढची भूमिका काय असेल हे दोन दिवसात स्पष्ट करेन असे चव्हाण यांनी सांगितले.

अशोक चव्हाण यांनी नुकतीच मुंबईत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर प्रदेशाध्यक्षांना काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये असताना नेहमीच प्रामाणिकपणे काम केलं. मला कोणाबद्दल कसलीही तक्रार करायची नाही, राजीनामा देण्यामागे कुठलीही व्यक्तीगत भावना नाही. माझी पुढची राजकीय दिशा काय असेल याबाबत निवेदन निश्चित करेन. एक ते दोन दिवसांत तुम्हाला सर्वकाही सांगेन.

दरम्यान, यावेळी चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आले की, तुम्ही भाजपात जाणार का? भाजपा तुम्हाला राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, त्यात किती तथ्य आहे? यावर अशोक चव्हाण म्हणाले, मला भाजपाची कार्यप्रणाली माहिती नाही. भाजपात जाण्याचा मी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मी मघाशी सांगितल्याप्रमाणे येत्या दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन.

काँग्रेस सोडण्याबाबत प्रश्न विचारल्यावर अशोक चव्हाण म्हणाले, “प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे असं नाही. मी जन्मापासून काँग्रेसचं काम केलं आहे, आता मला वाटलं अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून राजीनामा दिला आहे.” पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चेवर प्रश्न विचारल्यावर अशोक चव्हाण म्हणाले, मला कोणतीही पक्षांतर्गत गोष्ट जाहीर करायची नाही, किवा उणीदुनी सांगायची नाहीत. कोणत्याही काँग्रेसच्या आमदाराशी माझं काही बोलणं झालेलं नाही. काँग्रेस सोडणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी मंत्री असताना भाजपासहित सर्व पक्षांच्या आमदारांना निधी दिला आहे. मी कधीही भेदभाव केला नाही.