आदेश येताच राज ठाकरे दिल्लीत हजर ; भाजपसोबत युतीची चर्चा

नवी दिल्ली, १९ मार्च २०२४ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत त्यांनी अवघ्या काही सेकंदांसाठी पत्रकारांशी संवाद साधला. शनिवारी लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानंतर सोमवारी राज ठाकरेंनी दिल्लीला जाणं हे सूचक मानलं जातं आहे. राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राज ठाकरे जर महायुतीत सहभागी झाले तर जागावाटपातला आणखी एक भिडू वाढणार आहे. अशा सगळ्या परिस्थितीत राज ठाकरेंच्या दिल्लीवारीतून काय फलित बाहेर येतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. २०१९ च्या त्यांच्या सभांमधला त्यांचा लाव रे तो व्हिडीओचा डायलॉग आणि त्यांच्या सभा दोन्ही गाजल्या होत्या. मात्र महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून राज ठाकरे आणि महायुती यांच्यातली जवळीक वाढली आहे. आता राज ठाकरे महायुतीचा भाग होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दिल्लीत गेल्यावर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

“आत्ता माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही. मला काहीही माहीत नाही. मला फक्त या असं सांगितलं त्यामुळे मी आलोय.” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे आणि हसत हसत ते निघून गेले.
दरम्यान, राज ठाकरे यांना दिल्लीत बोलवून घेणं, त्यांच्याशी चर्चा करुन पुढचा निर्णय ठरवणं यात भाजपाचं बेरजेचं राजकारण दिसून येतं आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४०० पारचा नारा दिला आहे. हा नारा पूर्ण करण्यासाठी भाजपाकडून पूर्णपणे प्रयत्न होताना दिसत आहेत. आता राज ठाकरेंशी नेमकी काय चर्चा होते? त्यांना महायुतीत सहभागी करुन घेतलं जातं का? महायुतीत राज ठाकरे सहभागी झाले तर त्यांना किती जागा दिल्या जाणार? किंवा या सगळ्याशिवाय वेगळी काही ऑफर त्यांना मिळणार का? या प्रश्नांची उत्तरं राज ठाकरे किंवा भाजपाचे श्रेष्ठीच देऊ शकणार आहेत. मात्र राज ठाकरेंचा दिल्ली दौरा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे यात काही शंकाच नाही.