अजित पवारांच्या दमबाजीला विजयातून प्रत्युत्तर अमोल कोल्हे, नीलेश लंके, बजरंग सोनवणे यांनी मारले मैदान
मुंबई, ६ जून २०२४ : ‘तू निवडून कसा येतो, तेच पाहतो’, हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धमकीवजा प्रसिद्ध झालेला ‘डायलॉग’ त्यांच्याच अंगलट आल्याचे या लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी अशीच दमबाजी केली होती. मात्र लोकसभेच्या मैदानात त्यांच्या दमबाजीला ना उमेदवारांनी भीक घातली, ना जनतेने त्यांना गांभीयनि घेतले. दमबाजीनंतरही अमोल कोल्हे, नीलेश लंके आणि बजरंग सोनवणे यांनी लोकसभेचे मैदान मारले.
मागील लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान
अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचा आवाका काढला. तुझा आवाका किती? बोलतो किती? तू बोलतोय कोणाबरोबर?, असे म्हणत आता तू निवडून येतोच कसा, असे म्हणत चांगलाच दम दिला होता. एवढ्यावरच न थांबता अजित पवार यांनी पुढील सहा महिन्यांत विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांचा पराभव घडवून आणला. शिवतारे यांच्या ठरवून झालेल्या पराभवाची राज्यभर चर्चा झाली. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून फारकत घेत महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तसेच बारामती मतदारसंघातून पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीकडून उमेदवारीही घेतली. सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी जिवाचे रान केले. ज्या विजय शिवतारे यांना पराभवाची धूळ चारली त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अजित पवारांची दमछाक झाली. एवढे करूनही सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न उलटला
अजित पवार यांनी यावेळच्या लोकसभा
निवडणुकीत अमोल कोल्हे, नीलेश लंके आणि बजरंग सोनवणे यांनाही पराभूत करण्याची धमकी दिली होती. मात्र त्यांच्या या धमकीला कोल्हे आणि सोनवणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. सोनवणे यांनी तर पार्थ पवार यांच्या पराभवाची आठवण करून देत, आपल्या मतदारसंघाची काळजी करण्याचा सल्ला दिला होता. अखेरच्या क्षणापर्यंत अजित पवार यांनी या तिन्ही उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते यशस्वी झाले नाहीत.
शरद पवार यांच्या या तिन्ही उमेदवारांनी त्यांच्या-त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. कोल्हे यांनी शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा लाखाच्या फरकाने पराभव केला. नीलेश लंके यांनी नगर दक्षिणमधून भाजपच्या सुजय विखे तर बजरंग सोनवणे यांनी बीडमधून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करत अजित पवार यांना चोख प्रत्युत्तर दिले.