अजित पवारांवर भाजपचीच मंडळी भ्रष्टाचाराचा आरोप करतात – जयंत पाटील यांचा टोला
मुंबई, ४ जुलै २०२४ः “माझ्यावर मधल्या काळात भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले गेले. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल”, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “त्यांच्याबरोबर जे आहेत, तेच त्यांच्यावर जास्त आरोप करतात”, असा टोला जयंत पाटील यांनी अजित पवारांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही लगावला.
अजित पवारांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ ट्वीट केला. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, “राजकारणात आलं म्हणजे विरोध तर होणारचं. जो जास्त काम करतो, त्याला तर थोडा जास्तीचा विरोध होतो. म्हणूनच सहन पण करावा लागतो. म्हणूनच माझ्यावर मधल्या काळात भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले गेले. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल. पण विकासाचं मॉडेल म्हणजेच सर्वसामान्यांप्रमाणे सरकारी योजनांचा लाभ आणि जनतेला दिलेलं बळ सगळ्यांना दिसतंय. या पुढच्या काळात देखील असंच दिसत राहील”, असे अजित पवारांनी म्हटले.
त्यावर जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. “एखादी गोष्ट आम्ही स्वत: केली अस कधीच कोणी सांगितलेलं नाही. त्यामुळे त्यांचा तो स्वभाव आहे. महाराष्ट्राच्या लोकसभेचा कल जाहीर झाला. जनतेने काय कौल दिला तो आपल्याला माहितीच आहे. लोक या सरकारविरोधातही आहेत. लोक एनडीए दिल्लीतील सरकारविरोधातही आहेत. त्यापेक्षा जास्त राग आणि संताप महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत जनतेचा आहे. त्यामुळे त्यांचे अंतर्गत सर्व्हे हे ५० ते ६० जागांपेक्षा जास्त दाखवत नसतील, तर म्हणूनच या अतिशय टोकाच्या अशा योजना करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्यांच्याबरोबर जे आहेत त्यांनीच अजित पवारांवर सर्वात जास्त टीका केली आहे. विरोधकांनी अजित पवारांवर फारशी टीका केलेली नाही. त्यांच्याबरोबर जे आहेत त्यांनी आयुष्यभर टीका करण्यातच घालवलेलं आहे. २००३ पासून ते अजित पवारांवर टीका करत आहेत. आता अजित दादा काही कारणांमुळे अडचणीमुळे त्यांच्या बाजूला जाऊन बसले आहेत. त्यामुळे त्यांच्या आसपासच त्यांना विरोधक सापडतील”, असा टोलाही जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांनी लगावला.
महायुतीत श्रेयवाद
“एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला त्याचं श्रेय जातंय. कदाचित हा श्रेयवाद असेल, याबद्दल मी उत्तर देणं योग्य ठरणार नाही”, असेही जयंत पाटील यांनी म्हटले. दरम्यान सध्या अजित पवारांच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.