‘अजित दादांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावे’ – अमोल मिटकरी यांची धक्कादायक प्रतिक्रिया, वंचितकडून सावध भूमिका
मुंबई, २२ जून २०२४: महायुतीत अजितदादांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे त्यांनी आता प्रकाश आंबेडकरांसोबत जावं असे विधान अजित पवारांचे विश्वासू आमदार अमोल मिटकरी यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय खळबळ उडाली होती. आता या विधानावर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांनी भाजपची साथ सोडल्यानंतर विचार करू असे सांगत सावध भूमिका घेतली आहे.
अजित पवार आणि महायुतीबाबत अकोल्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना मिटकरी म्हणाले होते की, महायुतीत अजितदादांना (Ajit Pawar) एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे. एवढेच काय तर, काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही मिटकरी यांनी केला होता. अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावे यासाठी काहीजण मानसिक खच्चीकरण करण्याचाही प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. महायुतीतून अजितदादा बाहेर पडले आणि प्रकाश आंबेडकर आणि अजितदादा एकत्र आले तर, विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवून शकतील असा विश्वासह मिटकरी यांनी बोलताना व्यक्त केला होता.
भाजपसोबत युती तोडल्यावर विचार करू
मिटकरी यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता मिटकरींच्या विधानावर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडी आणि अजित पवार गट एकत्रित येण्यासंबंधी अमोल मिटकरींनी विधान केले आहे. पण, सध्या अजित पवार यांचा पक्ष भाजपसोबत युतीमध्ये आहे. या परिस्थितीत वंचित त्यांना सोबत घेण्याचा विचार करू शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे भाजपसोबत मैत्री ठेवण्याच्या विरोधात आहे. त्यामुळे जोपर्यंत अजित पवार गट भाजपसोबत संबंध तोडत नाही तोपर्यंत मिटकींच्या विधानावर गांभीर्याने विचार करता येणार नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.