खैरेंच्या पराभवाने ठाकरे गटात धुसफूस, अंबादास दानवेंवर खैरेंनी केली टीका
छत्रपती संभाजीनगर, ५ जून २०२४ : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमदेवार संदीपान भुमरे यांनी दणदणीत विजय मिळवला. भुमरेंनी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंचा १ लाख ३४ हजार ६५० मतांनी पराभव केला. त्यानंतर चंद्रकांत खैरेंनी या पराभवाचं खापर अंबादास दानवे यांच्यावर फोडत निवडणुकीत सर्व काही मीच करायचे होते का?, मला निवडून आणायची जबाबदारी त्यांचीही होती, अशी टीका केली.
एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी ३ लाख ४१ हजार ४८० मते घेतली. तर खैरेंनी २ लाख ९३ हजार ४५० घेतली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर चंद्रकांत खैरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पराभव होईल असे कधीच वाटले नव्हते. हा पराभव मनाला लागणारा आहे. आपण कधी भ्रष्ट्राचार केला नाही. निर्व्यसननी मानसाला मतदारांनी मत दिली नसल्यानं आपण दुखी झालोय, असं खैरे म्हणाले.
ते म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे इथे मुक्कामी होते, त्यांनी काय घोळ केला माहिती नाही. संदीपान भुमरे यांनी ८० कोटी रुपये वाटप केले, काही लोक पैशांच्या मागे पडले. हा पैशांचा विजय आहे. धनशक्तीचा विजय आहे, असा आरोप खैरेंनी केला. मुख्यमंत्री चार दिवस शहरात होते. इव्हीएम मध्ये काही तरी झाले असेल. पहिल्या फेरीत मी कधीच मागे नव्हतो, पण या वर्षी मी मागे राहिलो. आमचे दोन जिल्हाप्रमुख आहेत. त्यातले एक आहेत अंबादास दानवे. त्यांनी काम केलं पाहिजे होतं. निवडून आणण्याची जबाबदारी त्यांची होती. सर्वकाही मीच केलं पाहिजे होतं का? त्यांनी आपला मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी फिरालाय नको होतं, असं खळबळजनक वक्तव्य केलं. उद्धव ठाकरेंना सर्व काही सांगणार आहे, असंही खैर म्हणाले.