अमित शहांकडून एकनाथ शिंदेंना अभय; कार्यक्षमपणे काम करण्याचा दिला कानमंत्र
मुंबई, १ मे २०२३ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठल्याही गोंधळाच्या पार्श्वभूमीवर दबावत न येता कार्यक्षमपणे काम करण्याचा कानमंत्र दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून अभय मिळाल्याचे चित्र असून मुख्यमंत्री बदलाच्या दृष्टीने चर्चा नसल्याची ही स्पष्ट केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्याच्या राजकारणात गेले दोन आठवडे कमालीची अस्वस्थता जिर्माण झाली होती. विशेषता खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार दुर्घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे अडचणीत आले होते. दुसरी घटना अजित पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपला पाठिंबा देणार असल्याची चर्चा कमालीची रंगली होती. राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे कमालीचे वेगाने वाहू लागले होते.
एकनाथ शिंदे बदलले जाणार? अजित पवार होणार नवे मुख्यमंत्री? अजित पवार यांच्याऐवजी विखे पाटील यांना संधी मिळणार? अशा अनेक बातम्यांनी वृत्त माध्यमं रंगात होती. दुसरीकडे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचा उत्साह वाढवत नेला होता. राज्यात मुख्यमंत्री बदलला जाणार, या चर्चा टोकाला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस सर्व कार्यक्रम रद्द केले.
मुख्यमंत्री आजारी असल्याच्या चर्चेने त्यात अधिकच भर घातली. त्याच्या दोनच दिवसात मुख्यमंत्री सर्व कार्यक्रम रद्द करत चार दिवस मूळ गावी निघून गेले. आता सरकार बदलणारच हे जणू नक्की झालं असल्याचं समोर येत होतं. याच दिवशी मुख्यमंत्री यांनी 65 फायली क्लिअर केल्याचे सांगत आपण सुट्टीवर असलो तरी कामात आहोत हा संदेश दिला.
या दोन आठवड्यात मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून आलेल्या दैनंदिन कार्यक्रमात केवळ एक कार्यकामाची नोंद होती. सातारा येथे असताना अमित शाह नागपुरात येणार असल्याचे समोर आले. कार्यक्रम गुरुवारी असताना मुख्यमंत्री एक दिवस आधीच नागपुरात दाखल झाले होते. पण अमित शाह या कार्यक्रमाला आलेच नाहीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काय होणार? याबाबत संदिग्ध वातावरण कायम होतं. तीन दिवसांनी अमित शाह हे रविवारी मुंबई दौऱ्यावर आले. हा कार्यक्रम जरी कौटुंबिक, खासगी असला तरी राज्यातील स्थिती आणि मुंबई महापालिका कार्यक्रम यावर चर्चा झाली. शिंदे हे दोन दिवस सावलीप्रमाणे अमित शाहांच्यासोबत होते. या भेटीत शाह-शिंदे यांची वैयक्तिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रानी दिली.
अमित शाह हे दिल्लीला रवाना झाले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे कामाला लागले. गेले दोन आठवडे संथ असलेले मुख्यमंत्री आज सोमवारी कमालीचे कामाला लागले होते. सकाळी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमापासून कामगार दिवस, एसटी महामंडळ, आपला दवाखाना उद्घाटन तसेच विविध बैठका यासारख्या अनेक कार्यक्रमांना त्यांनी आपली हजेरी लावली. केवळ हजेरीच नाही तर प्रत्येक ठिकाणी तुफान बॅटींग केली.
एकुणच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामांचा धडाका पाहता अमित शाहांनी काय कानमंत्र दिला का? अशीच चर्चा सुरु आहे. कानमंत्र नक्कीच असेल की, काही बदल होणार नाही. काम करा या वाक्याने एकनाथ शिंदेंमध्ये जोश भरला का? अशीच चर्चा रंगली आहे.