विधानसभेच्या उमेदवाराला पसंतीक्रम देण्यावरून भाजपमध्ये गटबाजी आली उफाळून
पुणे, २ आॅक्टोबर २०२४: पक्षातंर्गत लोकशाहीचा दावा करणाऱ्या भाजप मध्ये विधानसभा निवडणूकांच्या जागांसाठी पक्षाच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेण्यासाठी मंगळवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रीयेत विद्यमान आमदारांकडून विधानसभेसाठी इच्छूकांची नाकेबंदी केल्याचे दिसून आले. त्यामुळे काही ठिकाणी वाद झाला तर अनेकांनी या मतदानावरच बहिष्कार टाकत मतदानाच्या ठिकाणी केवळ उपस्थिती दाखवित काढता पाय घेतला.
खडकवासला, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, कसबा कॅन्टोंन्मेंट मतदारसंघासाठी हे मतदान घेतले गेले. त्यात, पर्वती, खडकवासला आणि शिवाजीनगर मध्ये अनेकांनी आक्षेप घेतल्याने वादाची स्थिती ओढावली. मात्र, निरिक्षकांनी मध्यस्ती करत मतदान प्रक्रीया पुढे नेली.
इच्छूकांची कोंडी
पक्षांतर्गत मतदान मंगळवारी होणार असल्याची माहिती शहर पदाधिकाऱ्यांना सोमवारी दुपारी पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली. परिणामी या बैठकीस दांडी मारलेल्या अनेक इच्छूकांना याबाबत कल्पनाच नव्हती. मंगळवारी सकाळी अनेकांना माध्यमातील बातम्यां मधून ही माहिती मिळाली.या मतदानासाठी पक्षाने १४ वेगवेगळया पदावर असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली होती तसेच आयत्या वेळी कार्यकर्ते आल्यास त्यांना मतदान करू द्यावे असे सांगण्यात आले होते. ही सूचना फक्त विद्यमान आमदारांना देण्यात आली होती. याचा फायदा घेत आमदारांनी आपल्या मतदारसंघात पदे दिलेल्या आपल्या लोकांनाच निरोप दिले त्यामुळे तेच आले तर दुसरीकडे त्यांनी काही कार्यकर्तेही अचानक बोलविले, त्यामुळे या कार्यकर्त्यांनी आमदारांचीच नावे पहिल्या क्रमांकावर लिहल्याने अनेकांनी आयत्या वेळच्या मतदानास आक्षेप घेतला, खडकवासला मतदारसंघात तर तीन उमेदवारांची नावे सांगा मगच मतदान करू अशी भूमिक पदाधिकाऱ्यांनी घेतली,तर पर्वती मध्ये निरोप न मिळाल्यावरून वाद झाले. तर शिवाजीनगर मध्ये अचानक ३० मतदान कसे वाढले यावरून गोंधळ झाला.
कार्यकर्त्यांना दमबाजी
कोथरूड मध्ये अनेक पदाधिकाऱ्यांना विद्यमान आमदार वगळता इतर इच्छूकांची नावे लिहू नयेत असे आदेश देण्यात आल्याचा आरोप इच्छूकांकडून केला जात आहे. तर, काही ठिकाणी आज मतदानाला जाताना ज्याचे नाव द्यायचे त्याचे नाव द्या पण तुम्ही कोणाला पसंती देणार हे आम्हाला कळेलच असा दमच विद्यमान आमदारांचे पदाधिकारी देत असल्याचे काही कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.