uddhav Thackeray

सांगलीत बंडखोरी झाली तर काँग्रेस जबाबदार उद्वध ठाकरेंनी बजावले

मुंबई, १६ एप्रिल २०२४ : महाविकास आघाडीतील सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. पण यावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आम्ही सांगली सोडणार नाही, बंडखोरी झाली तर त्याला काँग्रेस जबाबदार असेल असे स्पष्ट केले.

आगामी निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गीत लाँच करण्यात आले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पत्रकारांनी त्यांना सांगली मतदारसंघातील तिढ्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, सांगलीत महाविकास आघाडीला फटका बसेल असं काहीही होणार नाही. जागावाटप झालं. आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत अधिकृत जागावाटप जाहीर केलं आहे. आता जर कुठं बंडखोरी आणि वेगळं काही होत असेल तर ती जबाबदारी पक्ष नेतृत्वाची आहे. आणि जर असं घडलं तर जनता त्यांना स्थान देणार नाही.

महायुतीचे नेते राज्यात 45 पेक्षा जास्त जागा जिंकू असे सांगत आहेत. त्यांचा स्ट्राइक रेट 45 राहिल तुमचा किती असेल असा प्रश्न विचारला असता ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचा राज्यात 48 चा स्ट्राइक रेट आहे. त्यांचा तर 45 चा स्ट्राइक रेट हा सगळ्या देशात आहे. आमचा तर फक्त राज्यातला आहे असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला.

भाजपा व्हॅक्यूम क्लिनर झालाय कारण ते सगळे भ्रष्टाचारी गोळा करत आहे. मोदींचा व्हॅक्यूम क्लिनर सगळीकडे फिरतोय अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर केली.

शिवसेनेचे मशाल गीत लाँच
दरम्यान, आज ठाकरे गटाकडून नवीन गीत लाँच करण्यात आले. मशाल या चिन्हात काही बदल करून नवीन चिन्हही प्रसिद्ध करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत गीत आणि पक्षचिन्ह लाँच केले. राज्याच्या कानाकोपऱ्यात मशाल चिन्ह पोहोचलं आहे. आता हे फक्त चिन्ह नाही तर सरकारविरोधात असणारा असंतोष या माध्यमातून बाहेर पडणार अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली.