पुण्यातून लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर

पुणे, १३ मार्च २०२४: भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर असे शिक्कामोर्तब केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मुरलीधर मोहोळ की जगदीश मुळीक अशी चर्चा सुरू असताना मोहोळ यांच्या बाजूने पक्षश्रेष्ठींनी कौल दिलेला आहे. आता काँग्रेस कडून उमेदवार कोण येणार याकडे लक्ष लागलेली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातून मोहोळ, मुळीक यांच्यासह सुनील देवधर, संजय काकडे, शिवाजी मानकर ही इच्छुकांची मोठी यादी होती. मोहोळ, मुळीक आणि देवधर या तिघांमध्ये मुख्य स्पर्धा असल्याचे बोलले जात होते. यासाठी या उमेदवारांकडून गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वतःची फिल्डिंग लावण्यासाठी पूर्ण शक्ती वापरलेली होती. गेल्या काही दिवसापासून जागा वाटपाची चर्चा सुरू असताना पुण्यातून कोणाला उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली होती. अखेर भाजपने आज सायंकाळी. महाराष्ट्रातील प्रमुख लोकसभा मतदारसंघाची यादी जाहीर केली यामध्ये पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पुणे महापालिकेचे अडीच वर्षे महापौर होते, त्यापूर्वी त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाची देखील धुरा सांभाळलेली आहे. पक्ष संघटनेत देखील त्यांनी काम केले असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. तसेच समाज माध्यमांवर देखील त्यांचा प्रभाव असल्याने त्यांची लोकप्रियता आहे. अशातच आता भाजपच्या इच्छुकांमध्ये विजयाची खात्री असलेला उमेदवार म्हणून त्यांचे नाव पक्षश्रेष्ठींनी निश्चित केलेले आहे.