चंद्रकांत पाटील म्हणाले “लोकसभेच्या लग्नासाठी विभक्त झालेली कुटुंब एकत्र”

पुणे, ४ मार्च २०२४ ः आमचे मतभेद असले तरी ते आम्ही चर्चेने सोडवू शकतो. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे याबद्दल सर्वांचे एकमत आहे. ज्या वेळी घरात मोठे लग्न असते, तेव्हा वेगवेगळ्या कारणाने विभक्त झालेले कुटुंब एकत्र येतात. त्यानंतर जे पुन्हा वेगळे होतात. किंवा आपण पुन्हा एकत्र येऊयात असाही विचार होतो. देशात लोकसभा नावाचे लग्न असून त्यासाठी सर्वजण मतभेद बाजूला ठेऊन एकत्र आले असून, देशात ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचे आहेत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले

पुणे, बारामती, शिरूर या तीन लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये समन्वयासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.
‘‘लोकसभा निवडणूक वार सुरू झालं आहे, त्यामुळे तीन लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठक झाली. यास महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते. कुटुंबातील एखादी गोष्ट खटकत असेल तर ते सांगण्याचे स्वातंत्र्य आहे. आजच्या बैठकीत उमेदवाराबाबत चर्चा झालेली नाही. केंद्र सरकारने ३७० कलम रद्द केले, त्यामुळे प्रत्येक बूथवर ३७० मते जास्त मिळवावेच असे मोदींनी आवाहन केले आहे, त्यावर चर्चा झाली. महायुतीतील प्रत्येक घटकाला बैठकीला बोलावले होते. निरोप देण्यासाठी वॉट्सॲप ग्रुपही केला आहे. त्यामुळे कोणाला निरोप पोचला नाही असे होणार नाही.

आरक्षण देत येत असूनही दिले नाही
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी सगेसोयरे शब्द कायद्यात समाविष्ट केला जाणार आहे. त्यासाठी सरकारने अधिसूचना काढली असून त्यावर साडेसहा लाख हरकती आलेल्या आहेत. या प्रत्येक हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे, त्यासाठी मोठी प्रक्रिया राबवली जाणार आहे. वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सगेसोयरे शब्द कायद्यात समाविष्ट करण्यासंदर्भात जो कागद हातात दिला. तो मागे घेतलेला नाही. तसेच सरकारने १० टक्के आरक्षण देऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. पण काही निर्णय घेतला तरी टीका करून महायुतीला बदनाम करायच काम सुरू आहे. ज्यांना मराठा आरक्षण देता आला असते पण त्यांनी दिल नाही. आता लोकसभा निवडणूक हातातून जात आहे असे लक्षात आल्याने ते अशी टीका करत आहे, असा टोला पाटील यांनी विरोधीपक्षाच्या नेत्यांना मारला.