पार्थने गज्या मारणेची भेट घेणे चुकीचेच – अजित पवार मुलाची चूक मान्य करावी लागली
पुणे, २६ जानेवारी २०२४: पुण्यातील कोथरूड परिसरात मोठी दहशत माजवणारा कु्ख्यात गुंड गजा मारणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची भेटीचा फोटो समोर आला होता. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर अखेर आज (दि.२६) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात प्रजासत्ताक दिनानंतर पत्रकारांशी बोलत होते.
पार्थ आणि गजा मारणे यांच्या भेटीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणे यांच्यातील भेट अत्यंत चुकीची घटना आहे. भविष्यात असं काही घडू नये यासाठी मी पार्थला भेट झाल्यानंतर सांगणार असल्याचे अजितदादांनी सांगितले. यावेळी त्यांनी रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर तसेच मराठा आरक्षण आंदोलनावरही भाष्य केले.
लोकसभा निवडणुका अगदी जवळ आलेल्या असतानाच पार्थ पवार आणि गुंड गजा मारणे यांची भेट झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. सध्या या भेटीची जोरदार चर्चा सुरू असून, ही भेट आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच होती का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, या भेटीमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे माजी नगरसेविका आहेत, त्यादेखील यावेळी उपस्थित होत्या.