महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप बाकी – जयंत पाटील

पुणे, ११ जानेवारी २०२४: महाविकास आघाडीचा आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्‍चित झालेला नाही. या विषयावर महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत आणखी एक बैठक होईल. या बैठकीनंतरच जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांना सामावून घेण्याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. त्यांनी इंडिया आघाडीत यावे, यासाठी बोलणे सुरु असल्याचेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आज जयंत पाटील पुण्यात आले होते. या वार्षिक सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या सर्वसाधारण सभेसाठीच्या निमंत्रण पत्रिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव होते. मात्र अजित पवार यांनी या कार्यक्रमास येण्याचे टाळले आणि ते गेल्या काही वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच या सभेला अनुपस्थित राहिले. याबाबत जयंत पाटील यांना प्रश्‍न विचारला असता, अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत मला कसे माहीत असणार, असा सवाल त्यांनी केला.

लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातून एकूण ४८ खासदार निवडून द्यायचे आहेत. यापैकी ४५ पेक्षा अधिक खासदार भाजपचेच विजयी होणार असल्याचा दावा, भाजपचे नेते करू लागले आहेत. याबाबत विचारले असता, त्यांनी ४८ पैकी किमान ३ का होईना खासदारकीच्या जागा सोडलेल्या आहेत. त्यामुळे खरं तर त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत, असा उपरोधिक टोला नाव न घेता त्यांनी भाजपला लगावला.