बावनकुळेंच्या मकाऊ दौऱ्यावर संजय राऊतानी पुन्हा एकदा भाजपला डिवचले

नाशिक, २३ नोव्हेंबर २०२३: गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका फोटोची चर्चा पाहायला मिळत आहे. चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमध्ये जाऊन कसिनोमध्ये जुगार खेळल्याचा दावा संजय राऊतांनी केल्यानंतर त्यावरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. या फोटोंवर बावनकुळेंसह भाजपाच्या अनेक नेत्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता संजय राऊतांनी त्यावरूनही भाजपाला लक्ष्य केलं आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळेंचा उल्लेख करत संजय राऊतांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं आहे. रावसाहेब दानवेंसह काही भाजपाच्या नेत्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिल्याबाबत विचारणा केली असता राऊत म्हणाले, “मकाऊला जाणं हा गुन्हा आहे असं मी कुठे म्हणतोय? पण तुम्ही लपवताय कशाला? तिथे कॅसिनो, पर्यटनातून चीननं आपली अर्थव्यवस्था भक्कम केली. जर बावनकुळे हे पाहायला असतील तर त्यात अपराधी वाटण्याचं काय कारण आहे? खुलासे का करताय?”
“उडवले असतील त्यांनी साडेतीन कोटी रुपये, आहेत त्यांच्याकडे पैसे. मान्य करा आणि शांत बसा. दानवे किंवा त्यांचे इतर लोक खुलासे का करतायत? त्यांचं मन का खातंय? तुम्ही मकाऊला जाऊन असं काय केलंय?” असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

अजित पवार गट व शिंदे गटाबाबत राऊतांचा मोठा दावा
दरम्यान, अजित पवार गट व शिंदे गटाचे आमदार-खासदार भविष्यात भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा संजय राऊतांनी यावेळी केला. “माझ्या पक्क्या माहितीनुसार अजित पवार गटाचे बहुतेक आमदार व शिंदे गटाचे बहुतेक सर्व आमदार-खासदार भविष्यात भाजपात प्रवेश करतील. जर भाजपाने त्यांना उमेदवारी दिली, तर ते कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील. कारण जरी धनुष्यबाण त्यांना मिळालं असलं, तरी धनुष्यबाणावर त्यांना कुणी आता मतदान करणार नाहीत. आणि उद्या अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह मिळालं, तरी शरद पवार जिथे आहेत तिथेच मतदान होईल. त्यामुळे यांना कमळाबाईच्या पदराखाली लपून निवडणुका लढाव्या लागतील”, असंही राऊत म्हणाले.

मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे.
“माझ्या आकलनानुसार ज्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरेंना सोडलंय, ते बहुतेक सगळे लोक पराभूत होतील. गद्दारांना स्वीकारण्याची महाराष्ट्राची मानसिकता नाही. लोक निवडणुकांची वाट पाहात आहेत”, असं ते म्हणाले.