शिंदे सरकार मध्ये गडबड: अजित पवार नाराज, बैठकांना अनुपस्थिती

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सायंकाळी केंद्रातील भाजप नेत्यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त करण्यात येऊ लागले. दिल्ली दौऱ्यातही अजित पवार अनुपस्थित असल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरून छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, “दादांना थ्रोट इन्फेक्शन (घशाचा संसर्ग) असल्यामुळे ते दिल्लीला जाऊ शकत नाहीत. बैठक अगोदर ठरली होती म्हणून आम्ही जातोय. आज कॅबिनेट होती, त्यांनी निरोप दिला की आज मी येणार नाहीय तुम्ही मिटिंग चालवा. जर दादा थ्रोट इन्फेक्शनमुळे देवगिरीतून मंत्रालयात जाऊन शकत नाही. तर दिल्लीला कसे जातील?

मनुष्य आजारी पडू शकत नाही का? दगदग, धावपळ, जागरणामुळे माणूस आजारी पडू शकतो”, असंही भुजबळ म्हणाले. दादांना राजकीय आजारपण आलं आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच छगन भुजबळ म्हणाले की, “दादांना राजकीय आजारपण कधीच येणार नाही. काळजी करू नका.”

मुख्यमंत्र्यांकडूनही स्पष्टीकरण

अजित पवार यांची प्रकृती चांगली नसल्याने ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यावरून उगाचच वेगळे अर्थ काढू नका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र अजित पवार यांच्या अनुपस्थिती ‘राजकीय आजार’ असल्याची टिप्पणी केली आहे. अजित पवार हे पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्याने नाराज असल्याचेही बोलले जात आहे. दैनंदिन कार्यक्रमानुसार पवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ४.३० पर्यंत मंत्रालयात उपस्थित राहणार होते. मात्र तब्येत बरी नसल्याचे कारण देत ते मंत्रालयात आलेच नाहीत. दिवसभर ते ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी होते. सकाळी त्यांनी गाठीभेटी घेतल्याचे समजते. घशाचा संसर्ग झाल्याने त्यांनी दिवसभर विश्रांती घेतली. रात्री पवार यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीचे मंत्री व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक पार पडली. पण अजित पवार बैठकीला उपस्थित नव्हते.