पहिले सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजींनी केले – शरद पवार
पुणे, १ ऑगस्ट २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शरद पवार यांची उपस्थिती होती. आपल्या भाषणात शरद पवार यांनी पुण्याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे ते सांगितलं. तसंच इतिहासातला एक प्रसंग सांगत छत्रपती शिवाजी महाराज हे सर्जिकल स्ट्राईकचे जनक कसे होते? त्याचाही दाखला दिला. त्यास मोदी यांनीही दाद दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते नरेंद्र मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायांनी केला
अलिकडच्या काळात या देशातल्या जवानांना देशाचं रक्षण करण्यासाठी साठी सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्याची चर्चा होते आहे. मात्र लाल महालात शाहिस्तेखान जेव्हा आला होता आणि तो तळ ठोकून बसला होता तेव्हा या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवरायांनी केला. आपल्याला ही गोष्ट कधीच विसरता येणार नाही. अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. असंही शरद पवार म्हणाले. तसंच इंदिरा गांधी, मनमोहन सिंह, बाळासाहेब देवरस, अटल बिहारी वाजपेयी यांसह अनेक दिग्गजांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे त्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही नाव आलं याचा विशेष आनंद होतो आहे असंही शरद पवार यांनी भाषणात नमूद केलं.
पत्रकारिता हे शस्त्रासारखं लोकमान्य टिळक यांनी वापरलं
ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडायचं असेल तर सामान्य माणसाला जागृत केलं पाहिजे हे लोकमान्यांना माहित होतं. त्यासाठी एका जबरदस्त शस्त्राची अवस्था आहे हे त्यांना कळलं. त्यामुळे त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रं सुरु केली. केसरीचा अर्थ सिंह असा होता. लोकमान्य टिळकांनी पत्रकारिता करत परकिय आक्रमणांवर प्रहार केले. ते कायम म्हणत होते की पत्रकारितेवर कुणाचाही दबाव असता कामा नये. ही भूमिका त्यांनी कायमच पाळली. १८८५ मध्ये पुण्यात काँग्रेसचा जन्म झाला. त्या काळात पहिलं अधिवेशन इथेच होणार होतं. पण प्लेगची साथ आली त्यामुळे मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानावर झालं. त्यावेळी मवाळ आणि जहाल असे दोन प्रकारचे नेते होते. जहालांचं प्रतिनिधीत्व लोकमान्य टिळक यांनी केलं. स्वराज्य हा माझा हक्क आहे आणि तो घेतल्याशिवाय मी राहाणार नाही हा नारा दिला. स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही त्रिसूत्री आणि त्या माध्यमातून स्वातंत्र्याचं आंदोलन त्यांनी केलं असंही शरद पवार यांनी यावेळी म्हणाले.
आजचा दिवस हा लोकमान्यांच्या १०३ व्या पुण्यतिथीचा आहे. त्याचा सोहळा या ऐतिहासिक पुणे शहरात होतो आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की देशात पुण्याचं एक वेगळं महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्या जगाला माहित आहे. याच पुणे जिल्ह्यातल्या शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आपल्या देशात अनेक राजे महाराजे होऊन गेले. मोगलांचं संस्थान असेल किंवा यादवाचं संस्थान असेल पण शिवछत्रपतींचं राज्य हे हिंदवी स्वराज्य होतं ते रयतेचं राज्य होतं. ते रयतेचं राज्य निर्माण करण्याचं काम पुण्यात झालं हा पुण्याच्या गौरवाचा एक भाग आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप