इगतपुरीतील घटनेवरून फडणवीस आणि काँग्रेस आमदारांमध्ये खडाजंगी
मुंबई, २६ जुलै २०२३ : विधिमंडळ अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. आज इगतपुरीमधील एका गरोदर आदिवासी महिलेच्या मृत्यूचा मुद्दा अधिवेशनात चर्चेत आला असता सत्ताधारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधक काँग्रेसच्या आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर विरोधकांनी सभात्याग केला.
काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी नाशिकच्या इगतपुरीमध्ये एका आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याच्या मुद्द्यावर चर्चेसाठी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. “इगतपुरीच्या सोनेवाडी गावात आदिवासी गरोदर महिलेला मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी अडीच किलोमीटर पायपीट करावी लागली. त्यातून ती इगतपुरीच्या दवाखान्यात पोहोचली असता तिथे डॉक्टरच नसल्याचं दिसतं. त्यामुळे पुन्हा ती गरोदर महिला वाडीवरे गावात गेली. तिथे तिची प्रकृती इतकी बिघडली की तिचा मृत्यू झाला. आपल्या प्रगत राज्यात एक आदिवासी महिला फक्त उपचार न मिळाल्यामुळे मृत्यूमुखी पडते ही अवस्था आहे. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला सारून या मुद्द्यावर चर्चा करावी”, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली
दरम्यान, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्या आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याची टीका नाना पटोलेंनी केली. “त्यांना आदिवासी म्हणून जगण्याचा अधिकार नाही का? इगतपुरीतल्या आदिवासी गरोदर महिलेची एक प्रकारे हत्याच शासकीय असंवेदनशीलतेमुळे झाली आहे. याला शासन जबाबदार आहे. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला सारून चर्चा घडवावी ही आमची मागणी आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे एका आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे. हे आपल्याला भूषणावह नाही”, असं नाना पटोले यावेळी म्हणाले.
दरम्यान, या मागणीवर विधानसभा अध्यक्षांनी सरकारला निवेदन देण्याचे दिले. त्यानंतरही सरकारवर टीका सुरूच होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बाजू मांडताना विरोधकांना फैलावर घेतले.
“निवेदन करण्यात येईल. खरंतर राजकीयच बोलायचं झालं, तर हे किती वर्षं होते सत्तेमध्ये? तेव्हा का नाही झालं? पण अशा गोष्टीत राजकीय बोलणं योग्य नसतं. त्यामुळे या गोष्टीवर त्यांनीही राजकारण करू नये. फक्त एखाद्या पेपरच्या बातमीवर इथे चर्चा होत नसते. इथले काही नियम आहेत. हे फक्त राजकारण चाललं आहे. असं राजकारण चालणार नाही. जर गांभीर्याने चर्चा करायची असेल, तर सरकार यावर निवेदन करेल. त्यात काही कमतरता असेल, तर चर्चा करायलाही सरकार तयार आहे”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, सरकारच्या भूमिकेमुळे समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला.