राष्ट्रवादीतील लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर ‘बीआरएस’ मध्ये दाखल
हैद्राबाद, २२ जून २०२३ : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची राजकीय मोर्चे बांधणी सुरू झालेली असताना तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष महाराष्ट्रामध्ये पाय पसरू पाहत आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी साम्राज्ञी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा पुणेकर यांनी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला आहे. ‘बीआरएस’मध्ये महाराष्ट्रातील आणखी बरीच नेते मंडळी जाणार असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चिंता वाढू लागली आहे.
के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला आहे. या प्रवेशाची नांदी करताना त्यांनी राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची पहिली सभा रविवारी 5 एप्रिल नांदेड येथे पार पडली. त्यानंतर त्यांनी राज्यात आपल्या पक्षाची पायमुळ घट्ट करण्यासाठी झपाट्याने सभा आणि पक्षप्रवेश करत आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादीच्या असलेल्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी देखील बीआरएसमध्ये प्रवेस केला आहे.
बुधवारी २१ जूनला लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा बीआरएस पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश झाला. सुरेखा पुणेकर यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये आपल्या काही सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे.
तर या अगोदर सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके भारत राष्ट्र समितीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात होतं. त्यांना पक्षात घेऊन केसीआर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमका करण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर भालकेंसह या १० माजी आमदारांनी हैदराबाद दौरा केला होता.
मात्र त्यानंतर त्यांच्या प्रवेशाला सध्या तरी ब्रेक लागला असल्यास देखील सांगण्यात आलं होतं. भालके यांच्या हैदराबाद दौऱ्यादरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा फोन आल्याने ते प्रवेश न करताच माघारी फिरले असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आता के चंद्रशेखर राव पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यामुळे हा पक्षप्रवेश आताच होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.