स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर
मुंबई, २१ मार्च २०२३ : करोना, ओबीसी आरक्षण यामुळे गेल्या वर्षभराहून अधिक काळ रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहेत. या निवडणुकांसंदर्भात आज (दि.२१ मार्च) एक महत्वाची सुनावणी होणार होती, मात्र या सुनावणीसाठी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे आज अनुपस्थित राहिल्याने ही सुनावणी होऊ शकली नाही.
ही सुनावणी आता मंगळवार, २८ मार्च रोजी होणार आहे. परिणामी या निवडणुकांचा निर्णय लांबणीवर पडला आहे. दरम्यान सध्या राज्यातील अनेक महापालिकांमध्ये लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आला असून, याठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत.
राज्यात २३ महापालिका, २०७ नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा व २८४ पंचायत समितीच्या निवडणुका होणे अपेक्षित आहेत. महाविकास आघाडी सरकारची वॉर्डरचना न्यायालयाने ग्राह्य धरल्यास निवडणूक प्रक्रिया लगेचच सुरू होऊ शकते. मात्र, तसे झाले तरी पावसाळ्याच्या आधी निवडणुका होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप