मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयतेने मतदान करावे-श्रीकांत देशपांडे
पुणे, 24 फेब्रुवारी 2023: लोकशाही प्रक्रीयेत योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदान करणे महत्वाचे असून मतदारांनी 26 फेब्रुवारी रोजी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीच्या अनुषंगाने सांगवी येथे आयोजित मतदार जनजागृती रॅलीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण, उपजिल्हाधिकारी अजय पवार, वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे संस्थापक पराग मते, मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस गुजराथी उपस्थित होते.
श्री.देशपांडे म्हणाले, लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्वाचा आहे. लोकशाही प्रक्रीयेत प्रत्येक मताला महत्व आहे. योग्य उमेदवार निवडण्यासाठी सर्व मतदार सक्षम आहेत. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्यात आपला सहभाग द्यावा आणि मतदानाचा संदेश घरोघरी पोहोचवावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी केले.
रॅलीमध्ये युवांचा उस्फूर्त सहभाग
इंदिरा महाविद्यालय, ताथवडे संचेती महाविद्यालय,थेरगाव येथील विद्यार्थ्यांनी मतदार जागृती उपक्रमात सहभाग घेतला. ‘मतदार राजा जाग तू, शहाण्यासारखं वाग तू’, ‘माझे मत माझा अधिकार’, ‘आमिषाला बळी पडणार नाही, मतदानापासून वंचित राहणार नाही’, ‘मत द्यायला जायचे आहे,आपले कर्तव्य बजवायचे आहे’, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले. यावेळी कलापथक व पथनाट्याच्या माध्यमातूनही निर्भयपणे मतदान करण्याचा संदेश देण्यात आला.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्याना मतदान करण्याचे आवाहन केले. प्रशासनाने मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा केली असून नागरिकांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मतदारसंघातील शनिमंदिर ते क्रांती चौकपर्यंत विविध गृह निर्माण संस्था व व्यापारी पेठेत भेट देऊन मतदार राजाला मतदानाचे आवाहन करण्यात आले. मतदारांना मतदार मार्गदर्शिकेचे वाटपही करण्यात आले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप