निवडणुकीत कुणाच्याही आमिषाला पडू नका – शुभांगी पाटील यांचं आवाहन
नाशिक, २९ जानेवारी २०२३ : सगळे पदवीधर भाऊ, बहिणी खूप चांगलं काम करत आहेत. जी जनशक्ती पेटली आहे, त्याचा चांगला परिणाम पाहण्यास मिळेल. कुणाच्याही खोट्या आमिषाला बळी पडू नका असं आवाहन पदवीधर निवडणुकीतल्या नाशिकच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी केलं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले सगळेच माझ्यासाठी प्रचार करत आहेत. तसंच आपल्याला काहीही करून ही निवडणूक जिंकायची आहे असंही शुभांगी पाटील यांनी म्हटलं आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीची चर्चा जोरात सुरू आहे. सत्यजीत तांबे यांनी जे केलं त्यामुळे ही निवडणूक चर्चेत आली. अशात महाविकास आघाडी माझ्या पाठिशी पूर्णपणे उभी आहे असा विश्वास शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसंच निवडणूक एकतर्फी होईल असा जो दावा सत्यजीत तांबे यांनी केला तो देखील शुभांगी पाटील यांनी खोडून काढला.
शुभांगी पाटील म्हणाल्या की तुम्ही सगळे पाहात आहात. शुभांगी पाटीललाच नाशिक, नगर, जळगाव, धुळे या ठिकाणाहून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पदवीधर भाऊ, बहिणी माझ्यासाठी खूप चांगलं काम करत आहेत. मी फक्त सगळ्यांना एकच विनंती करते की जनतेच्या कुणाच्याही खोट्या आमिषांना आणि आश्वासनांना बळी पडू नका. मी तुम्हाला आज शब्द देते की तुमच्याच माध्यमातून विजय झाल्यानंतर एक मोठं आंदोलन होईल. अनेक प्रश्नांसाठी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनसाठी, बेरोजगारीच्या विरोधात मी मोठं आंदोलन करणार आहे.
आपल्याला विजय खेचून आणायचा आहे हे लक्ष्य ठेवून सगळे काम करत आहेत. हा विजय आमचाच होणार आहे असंही शुभांगी पाटील यांनी म्हटलं आहे. नगरमध्ये नाना पटोले यांनी माझ्यासाठी माझ्यापेक्षा जास्त प्रचार केला. जयंत पाटील, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत की मला वाटत नाही की माझ्या विरोधात कुणी जाईल, मी निवडून येईन असा विश्वास मला वाटतो आहे असंही शुभांगी पाटील यांनी म्हटलं आहे.
शुभांगी पाटील यांनी बीए. डिएज. एम.ए. बी.एड. आणि एलएलबी या पदव्या घेत आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. शुभांगी पाटील या धुळ्यातील भास्कराचार्य संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र स्टुडंट असोसिएशन ही संस्था त्यांनी स्थापन केली. शुभांगी पाटील या धुळ्यातील एज्युकेशन सोसायटी आणि जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आहेत.
शुभांगी पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न होत्या. त्यानंतर पुढे जात २१ सप्टेंबर २०२२ ला शुभांगी पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. भाजपाने जेव्हा सत्यजीत तांबेंच्या माध्यमातून आपली चाल खेळली तेव्हा शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडीशी संपर्क केला.