कायद्याच्या अंमलबजावणीत लोकांचा सहभाग आवश्यक -डॉ.नीलम गोऱ्हे

नागपूर, २२ डिसेंबर २०२२ : विधिमंडळात सार्वजनिक हिताच्या भूमिकेतून लोकहिताचे कायदे केले जातात. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा. विद्यार्थ्यांनी अधिवेशनात विधेयकावर होणारी चर्चा आर्वजून ऐकली पाहिजे व विधेयक समजून घेण्यासाठी या चर्चांचा उपयोग होत असतो, असा कानमंत्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिला.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या ४९व्या संसदीय अभ्यास वर्गात विधिमंडळात विधेयकाचे महत्त्व व कार्यपद्धती तसेच विधिमंडळाचे विशेष अधिकार या विषयावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी नागपूर लोकमत आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठातील विद्यार्थी व अधिव्याख्येते उपस्थित होते.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, विधिमंडळ व्यक्ती आणि समाजाचे नियमन करण्यासाठी विधिमंडळात आवश्यक ते कायदे तयार केले जातात. कायदे समाजाच्या मागणीतून केले जातात. चळवळी व आंदोलनातूनही काही कायद्यांची निर्मिती होत असते. माहिला चळवळीतून महिलांविषयक अनेक कायदे विधिमंडळात संमत झाले आहेत. जे कायदे समाजात परिवर्तन घडवितात, न्याय देतात ते कायदे समाजात सर्वत्र पोहचवून त्या कायद्याचा अभ्यास करुन त्यात आवश्यक असणाऱ्या दुरुस्त्या केल्या जातात. कायदा बनविण्यासाठी काहीतरी कारण असायला पाहिजे. उदा. समाजातील अनिष्ट प्रथा व सामाजिक बहिष्कार सहन करायला लागतात त्यामुळे जात पंचायत कायदा करावा लागला. कायद्यात जर काही त्रृटी असतील तर त्याला न्यायालयात अपिल केले जावू शकते.

विधिमंडळात केलेल्या कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत गेली पाहिजे तरच त्या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असते. विधिमंडळात विधेयकांवर चर्चा होवून त्याचे कायद्यात रुपातंर केले जाते. विधेयक कसे वाचावे, खंड वाचावा, वाचताना त्याचे टिपण काढले पाहिजे. विधेयकावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कितीही वेळ सदस्य चर्चा करु शकतात. सभागृहात एखाद्या मुद्दावर मतभेद होवू शकतात. या वाद संवादातून सक्षम असा कायदा होतो.

विद्यार्थ्यांनी अधिवेशनात विधेयकावर होणारी चर्चा आर्वजून ऐकली पाहिजे व विधेयक समजून घेण्यासाठी या चर्चांचा उपयोग होत असतो. आजच्या युवकांनी कायद्याविषयी जागरुक राहणे आवश्यक असल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

विधिमंडळातील सदस्यांना विशेषाधिकार असतात. सभागृहाचे स्वातंत्र्य, प्रतिष्ठा व परंपरा तसेच सभागृहाचे व सदस्यांचे अधिकार अबाधित रहावे हा हेतू असून सदस्यांना कोणत्याही बाह्यशक्तीच्या दडपणाविना मोकळेपणे कार्य करता यावे. यासाठी विशेषाधिकार असल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नागपूर लोकमत आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांनी उपसभापती डॉ गोऱ्हे यांचा परिचय करुन दिला. तसेच यावळी डॉ.गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली. नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थींनी कु.नेहा कापगते यांनी आभार व्यक्त केले.